नाशिककर नागरिकांनी दाखविली स्वयंशिस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:14 AM2021-03-15T04:14:34+5:302021-03-15T04:14:34+5:30
नाशिक: कोरोनाचा फैलाव रोखण्याबरोबरच लॉकडाऊनची संभाव्य परिस्थिती टाळण्यासाठी नाशिककरांनी स्वयंशिस्त दाखविल्याने शनिवार आणि रविवार अशा दोन्ही दिवशी प्रशासनाच्या आवाहनाला ...
नाशिक: कोरोनाचा फैलाव रोखण्याबरोबरच लॉकडाऊनची संभाव्य परिस्थिती टाळण्यासाठी नाशिककरांनी स्वयंशिस्त दाखविल्याने शनिवार आणि रविवार अशा दोन्ही दिवशी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. गर्दीमुळे फैलावणारा कोरोना नियंत्रित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बाजारपेठा बंद ठेवण्याचे आावाहन केले होते. त्यानुसार नागरिकांनी देखील समजूतदारपणे भूमिका निभावली. लॉकडाऊन नकोच अशीच नाशिककरांची भूमिका असल्याचे त्यांच्या प्रतिसादावरून दिसून आले.
जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने त्यावर उपाययोजना म्हणून शासनाच्या आदेशाने जिल्हाधिकाऱ्यांनी काही निर्बंध घातले आहेत. गेल्या बुधवारपासून बाजारपेठा सायंकाळी ७ वाजेनंतर बंद होत आहेत तर शनिवार आणि रविवार या दोन दिवशी दुकाने पूर्णपणे बंद ठेवली जात आहेत. नागरिकांना देखील लॉकडाऊन नको असल्याने त्यांनी प्रशासनाच्या आवाहनाला उत्फूर्त प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.
मागील वर्षी लॉकडाऊनच्या अनुभवातून सावरलेल्या नाशिककरांचे दैनंदिन व्यवहार सुरळीत होत असतानाच पुन्हा निर्बंधाची वेळ आली. हे निर्बंध अधिक कठोर होऊ नये तसेच संसर्ग देखील नियंत्रणात आला पाहिजे या हेतूने नाशिककर नियमांचे पालन करीत असल्याचे दिसून आले. लॉकडाऊन कुणालाही परवडणारा नाही, अर्थचक्र आणि दैनंदिन व्यवहार सुरळीत व्हावेत अशीच नाशिकरांची मानसिकता दिसून आली. त्यामुळेच प्रशासनाने वेळीच घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करीत नागरिक आणि व्यापाऱ्यांनी देखील जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. शनिवार आणि रविवारी देखील नाशिककरांनी सूज्ञपणा दाखविल्याचे दिसून आले.
--इन्फो--
महापालिकेकडून कारवाई
संसर्ग रोखण्यासाठी असलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर महापालिकेकडून रविवारी देखील कारवाई सुरू होती.
शहरातील अनेक भागात महापािलकेच्या पथकाकडून पाहणी करण्यात आली. हॉटेलात गर्दी जमविणे तसेच मास्क न वापरणाऱ्यांवर सलग दुसऱ्या दिवशी देखील कारवाई करण्यात आली.
--कोट--
नाशिककर धन्यवाद
जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला नाशिककरांनी चांगला प्रतिसाद देत शनिवार आणि रविवारच्या बंदला सहकार्य केले. नाशिककरांचा प्रतिसाद असाच कायम राहिला तर कोरोना रूग्णांची वाढती संख्याही लवकरच कमी होऊ शकेल. नागरिकांचे सहकार्य महत्वाचे आहे.
- सूरज मांढरे, जिल्हाधिकारी.
--इन्फो--
जिल्हाधिकारी घेणार आढावा
काेरोना नियंत्रणासाठी आठवड्यातील दोन दिवस शनिवार आणि रविवारी बाजारपेठा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. या दोन दिवसांचा जिल्हाधिकारी सोमवारी (दि.१५) आढावा घेणार आहेत. महापालिका क्षेत्र , जिल्ह्यातील ग्रामीण भाग तसेच आयुक्तालयाच्या हद्दीतील कामकाजाचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर निर्बंधाबाबतची पुढील दिशा ठरविली जाणार असल्याचे समजते.