लसीकरणासाठी नागरिकांची झुंबड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 10:04 PM2021-05-06T22:04:53+5:302021-05-07T00:52:48+5:30
मानोरी : येवला तालुक्यातील मुखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाच दिवसांनंतर लसीकरणाला सुरुवात झाल्याने गुरुवारी (दि. ६) लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यावेळी नागरिकांना फिजिकल डिस्टन्सिंगचा विसर पडत असल्याचे दिसून आले.

गुरुवारी सकाळी सुमारे ६ वाजताच्या दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्र मुखेड येथे नागरिक लसीकरणासाठी रांगेत उभे राहिल्याचे चित्र बघायला मिळाले. कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे ग्रामीण भागातील नागरिकांनी चांगलाच धसका घेतला आहे. लसीकरण तत्काळ करणे नागरिकांना गरजेचे वाटू लागले असून मुखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर लसीकरणासाठी झुंबड उडाल्याचे दिसून आले.
मुखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर मागील लसीकरण हे शुक्रवारी (दि. ३०) करण्यात आले होते. त्यावेळेस एकूण २०० जणांना लसीकरण करण्यात आले होते, मात्र लसीकरणासाठी चारशे ते पाचशे नागरिकांनी हजेरी लावल्याने अनेकांना लस न घेताच माघारी फिरावे लागले होते. त्यामुळे ३० तारखेला लसीकरण न होऊ शकलेल्या नागरिकांनी गुरुवारी (दि. ६) रोजी सकाळी ६ वाजेपासूनच मुखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर लसीकरणासाठी रांगा करून आपले नंबर राखीव केल्याचे चित्र बघायला मिळाले. यावेळी रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांमध्ये नंबर लावण्यावरून बाचाबाचीदेखील होत असल्याचे यावेळी दिसून आले.