सिडकोतील लसीकरण केंद्रावर नागरिकांचा राडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:17 AM2021-07-14T04:17:56+5:302021-07-14T04:17:56+5:30
लस न मिळाल्याने राडा केला. संतप्त झालेल्या नागरिकांनी मनपाच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त करीत केंद्रावरच गोंधळ घातल्याने अखेर पोलिसांना ...
लस न मिळाल्याने राडा केला. संतप्त झालेल्या नागरिकांनी मनपाच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त करीत केंद्रावरच गोंधळ घातल्याने अखेर पोलिसांना पाचारण करावे लागले. पोलिसांनी मध्यस्थी करत नागरिकांना शांत केले.
महापालिकेच्या वतीने नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी सिडको व अंबड भागात लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. परंतु अनेक केंद्रावर लसीचा पुरेसा साठा उपलब्ध होत नसल्याने अनेक नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहूनही लस न घेताच माघारी फिरावे लागत आहे. सध्या सिडको भागात गोविंदनगर, जुने सिडको येथील बाळासाहेब ठाकरे उद्यान, सावतानगर येथील सावरकर हॉल, तिडकेनगर, गणेश चौक, जुने सिडको अचानक चौक येथील मनपा दवाखाना, अंबड, मोरवाडी हॉस्पिटल, हेडगेवार चौक, सुवर्णा मटाले यांच्या संपर्क कार्यालयासमोर लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. परंतु बहुतांशी सर्वच लसीकरण केंद्रावर केवळ ५० ते १०० इतकेच डोस दिले जात आहेत; परंतु प्रत्येक केंद्रावर सुमारे दीडशे ते दोनशेहून अधिक नागरिक दररोज पहाटेपासून लस घेण्यासाठी रांगा लावतात. त्यामुळे अनेक नागरिकांना लस न घेताच माघारी परतावे लागते.
सोमवारी हेडगेवार चौक येथील केंद्रावर केवळ ५० लस उपलब्ध होते, परंतु याठिकाणी दोनशेहून अधिक नागरिक लस घेण्यासाठी आल्याने रांगेत उभे राहूनही नंबर लागताच लस संपल्याचे नागरिकांना सांगताच त्यांचा संताप अनावर झाला व केंद्रावरच त्यांनी गोंधळ घातला. केंद्र चालक व आरोग्य कर्मचाऱ्यांनाही धारेवर धरण्यात आले त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांना पाचारण करण्यात आले. यावेळी नागरिकांनी पोलिसांकडेही तक्रारी केल्या. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करून वातावरण शांत केले.
कोट====
सिडकोत लस घेण्यासाठी गर्दी होते. त्याप्रमाणात लस उपलब्ध होत नाही. अनेक ज्येष्ठ नागरिक सकाळपासून रांगा लावतात परंतु मनपाकडून साठा पुरेसा होत नसल्याने अनेकांना माघारी फिरावे लागते. याबाबत मनपा आयुक्त व महापौर यांची भेट घेऊन हेडगेवार चौक येथे वाढीव लसीचा साठा मागणार आहे.
-भाग्यश्री ढोमसे, नगरसेवक,
(फोटो १२ लस)