ऐन उन्हात लागतायेत रेशनसाठी नागरिकांच्या रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 12:50 AM2018-05-08T00:50:51+5:302018-05-08T00:50:51+5:30
वडाळागावातील रेशन दुकानांवर हाताचे ठसे जुळविण्यासाठी आणि रेशन घेण्यासाठी महिला वर्गाच्या तळपत्या उन्हात लांबच लांब रांगा लागत आहेत. ऐन उन्हाळ्यात अशाप्रकारे रांगेत उभे राहावे लागत असल्याने नागरिकही त्रस्त झाले आहेत.
इंदिरानगर : वडाळागावातील रेशन दुकानांवर हाताचे ठसे जुळविण्यासाठी आणि रेशन घेण्यासाठी महिला वर्गाच्या तळपत्या उन्हात लांबच लांब रांगा लागत आहेत. ऐन उन्हाळ्यात अशाप्रकारे रांगेत उभे राहावे लागत असल्याने नागरिकही त्रस्त झाले आहेत. वडाळागाव शेतकरी आणि कामगार वस्ती म्हणून ओळखली जाते. गावामध्ये सुमारे दहा हजार लोकवस्ती असून, यामधील सत्तर टक्के लोकवस्ती कामगारांची म्हणून ओळखली जाते. अण्णा भाऊ साठेनगर, मेहबूबनगर, मुमताजनगर, पिंगुळबाग, झीनतनगर घरकुल योजना यांसह परिसरात बहुतेक नागरिक रोजंदारीवर काम करणारे आहेत. यापैकी बहुतेक घरातील पती-पत्नी रोजंदारीवर काम करण्यासाठी बाहेर जात असल्यामुळे दर महिन्याला परिसरातील रहिवाशांना रेशन दुकानातील धान्याशिवाय पर्याय नसतो. रेशन कार्ड, आधार कार्डशी लिंक करा तसेच मशीनला हाताचे ठसे जुळण्यासाठी ठसे देणे यांसह विविध नवनवीन योजना येत राहतात. परिसरात रोजंदारीवर काम करणारी वस्ती असल्याने दररोज कायम हाताचे ठसे जुळत नसल्याने रेशन घेण्यास त्रास होत असल्याची नागरिकांची तक्र ार आहे. तसेच तळपत्या उन्हात महिला वर्गाला रोजंदारी बुडवून तासन्तास लांबच लांब रांगा लावून ठसे जुळण्यासाठी आणि रेशन घेण्यासाठी यावे लागत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.