नागरिकांची कामे तातडीने करावीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 12:54 AM2019-03-16T00:54:34+5:302019-03-16T00:55:01+5:30
मनपा घेऊन देण्यात येणाऱ्या दाखल्यासाठी सर्वसामान्यांना पैसे व वेळ खर्च करावे लागतात. याकरिता जन्म-मृत्यूच्या नोंदणीकरिता एकाच व्यक्तीकडे नोंदणीचे काम देण्याचे आदेश मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले. नाशिकरोड मनपा विभागीय कार्यालय व इतर ठिकाणी गमे यांनी भेट देऊन पाहणी करत माहिती जाणून घेतली.
नाशिकरोड : मनपा घेऊन देण्यात येणाऱ्या दाखल्यासाठी सर्वसामान्यांना पैसे व वेळ खर्च करावे लागतात. याकरिता जन्म-मृत्यूच्या नोंदणीकरिता एकाच व्यक्तीकडे नोंदणीचे काम देण्याचे आदेश मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले. नाशिकरोड मनपा विभागीय कार्यालय व इतर ठिकाणी गमे यांनी भेट देऊन पाहणी करत माहिती जाणून घेतली.
मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी शुक्रवारी सकाळी नाशिकरोड मनपा विभागीय कार्यालयात भेट देऊन एक खिडकी विभाग, कर भरणा केंद्र, ई-सुविधा केंद्र, जन्म-मृत्यू विभाग, आरोग्य, विद्युत, पाणीपुरवठा आदी कार्यालयांची पाहणी करून तेथील कामकाजाची माहिती जाणून घेतली. अधिकारी-कर्मचारी यांच्याशी चर्चा करून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. त्यानंतर बिटको रूग्णालयाची नूतन इमारत, अग्निशामक केंद्र इमारतीची पाहणी करून माहिती घेतली.
जेलरोड के. एन. केला शाळेशेजारील मनपाच्या भाजीबाजाराच्या मोकळ्या पाहणी करतांना त्या ठिकाणी एका राजकीय पदाधिकाऱ्याचा फलक दिसल्याने गमे यांनी आचारसंहिता सुरू असतानाही फलक कसा काय राहिला याबाबत तीव्र शब्दात नापसंती व्यक्त केली. आता हे फलक आयुक्तांनीच काढायचे का? असा सवाल करत मनपा विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर व अतिक्रमण उपायुक्त रोहिदास बहिरम यांना खडे बोल सुनावले. जेलरोड पंचक येथील मनपाच्या रुग्णालयात भेट देऊन गमे यांनी नाराजी व्यक्त केली. दत्तमंदिररोड मनपा शाळा क्रमांक १२५ मध्ये गमे यांनी भेट देऊन शाळेची पाहणी केली. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे गांभीर्याने लक्ष देत मनपा शाळेचा दर्जा वाढवावा, असे आवाहन गमे यांनी केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त हरिभाऊ फडोळ, शहर अभियंता संजय घुगे, अधीक्षक अभियंता एस.एम. चव्हाणके, संदीप नलावडे, कार्यकारी अभियंता सी.बी. आहेर, देवेंद्र माळी, रोहिदास बहिरम, आरोग्याधिकारी सतीश हिरे, वैद्यकीय अधीक्षक गायकवाड आदी विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
विवाह नोंदणीसाठी प्रतिज्ञापत्राची गरज नाही
विवाह नोंदणीसाठी संबंधित व्यक्तिकडून प्रतिज्ञापत्र घेण्याची गरज नसल्याचे शासनाच्या परिपत्रकानुसार गमे यांनी स्पष्ट केले. संबंधिताचे स्वाक्षरी केलेले पत्र स्वीकारावे त्यामुळे वेळ वाचेल असे गमे यांनी स्पष्ट केले. याशिवाय पंचक येथील मनपाच्या रूग्णालयाची पाहणी करताना
इ-औषधाचे वाटप होत नसल्याचे दिसून आल्याने मनपातील सर्वच फार्मसिस्टचे जोपर्यंत ई-औषधे वाटप सुरू होत नाही तोपर्यंत वेतन रोखण्याचे आदेश गमे यांनी दिले. आचारसंहितेच्या काळात जेलरोड येथे राजकीय फलक आढळून आल्याने गमे यांनी मनपा विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांना त्वरित स्वत: जाऊन त्या फलकाचा फोटो काढून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.