निर्बंध शिथिल होताच पंचवटीत नागरिक रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:13 AM2021-06-02T04:13:06+5:302021-06-02T04:13:06+5:30
पंचवटी : कोरोना विषाणू संसर्ग कमी झाल्याने जिल्हा प्रशासनाने सोमवारपासून काहीसे निर्बंध शिथिल करताच पंचवटीकर नागरिकांनी विविध दुकानांत वस्तू ...
पंचवटी : कोरोना विषाणू संसर्ग कमी झाल्याने जिल्हा प्रशासनाने सोमवारपासून काहीसे निर्बंध शिथिल करताच पंचवटीकर नागरिकांनी विविध दुकानांत वस्तू खरेदीसाठी एकच गर्दी केल्याने नागरिकांसह दुकानदारांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.
सोमवारपासून सर्व दुकाने खुली करण्यास परवानगी दिल्याने सर्व दुकानांत नागरिकांनी विविध वस्तू खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. नागरिकांना बाहेर पडताना तोंडावर मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले असले, तरी नागरिकांना याचा विसर पडला होता, तर दुकानांत फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे असतानाही दुकाने भरगच्च झाल्याने दुकानातही कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले. पंचवटी कारंजा, मालेगाव स्टँड, हिरावाडी रोड, जुना आडगाव नाका, पेठ रोड यासह बाजारपेठ असलेल्या भागात मोठी वर्दळ असल्याने नागरिक जणूकाही कोरोना संपला या अविर्भावात रस्त्यावर उतरले होते.
अनेक मोठ्या दुकानांत सुरक्षित अंतराचे पालन करणे गरजेचे असले तरी गारमेंट्स, बेकरी, किराणा यासह अन्य दुकानांत कोरोना नियम पायदळी तुडविल्याचे स्पष्टपणे दिसून आले, तर नियम शिथिल केल्याने एरवी रस्त्यावर दिसणारे पोलीस तसेच महापालिका पथक दिसेनासे झाले होते. नियम शिथिल होताच सोमवारी सकाळपासून नागरिक रस्त्यावर आल्याने पंचवटीत सर्वकाही आलबेल असल्याचा भास काहीकाळ निर्माण झाला होता.