नियम शिथील होताच नागरिक रस्त्यावर : नियमांचे उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:14 AM2021-05-25T04:14:47+5:302021-05-25T04:14:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पंचवटी : नाशिक शहर तसेच जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने तब्बल बारा दिवस ...

Citizens on the streets as soon as the rules are relaxed: Violation of the rules | नियम शिथील होताच नागरिक रस्त्यावर : नियमांचे उल्लंघन

नियम शिथील होताच नागरिक रस्त्यावर : नियमांचे उल्लंघन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पंचवटी : नाशिक शहर तसेच जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने तब्बल बारा दिवस कडक लॉकडाऊन जाहीर केले होते. मात्र, बारा दिवसांच्या कालावधीनंतर प्रशासनाने नियम शिथील करताच नागरिकांना कोरोनाचा विसर पडला आणि नागरिक बिनधास्तपणे घराबाहेर पडले. त्यामुळे कोरोना नियम पायदळी तुडवले गेले. जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य आस्थापनादेखील सुरू करण्यात आल्याने त्यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित असताना पंचवटीत मात्र सर्वकाही सुरळीत असल्याचे दिसून आले.

सोमवारपासून प्रशासनाने कोरोना नियम शिथील केल्याने नागरिक सकाळपासूनच घराबाहेर पडल्याचे दिसून आले. भाजीपाला, किराणा दुकाने तसेच पेट्रोल पंपांवर नागरिकांची गर्दी झाली होती. अनेक युवक लॉकडाऊन संपल्याचा आनंद घेण्यासाठी रस्त्यावर दुचाकी घेऊन विनाकारण फिरत असल्याचेही दिसून आले. जीवनावश्यक सेवेत मोडणारी दुकाने सुरू होती, मात्र त्यात आणखी भर म्हणून कुठे वाहन दुरुस्ती केंद्र तर कुठे लॉन्ड्री, सलून, हार्डवेअर दुकानेही सुरू होती. अनेकांनी लॉकडाऊन संपला, असे गृहित धरून सोमवारी दुकानांच्या साफसफाईचे काम हाती घेतले होते.

बारा दिवस निर्बंध लादत प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर फिरण्यास मनाई केली होती. तसेच आवश्यक गरजेनुसार नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे सूचित केले होते; त्यानुसार पोलिसांनी परिसरातील मुख्य रस्त्यावर नाकाबंदी करून विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई सुरू केली होती तर मनपा प्रशासनानेही अनावश्यक गर्दी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली होती. परंतु, सोमवारी कोरोना नियम शिथील केल्यानंतर नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले. यावेळी त्यांना कोणत्याही यंत्रणेकडून अडविण्यात आले नाही. सोमवारी रस्त्यावर दुचाकी, चारचाकी, रिक्षा यासह खासगी चारचाकी वाहने मोठ्या प्रमाणात उतरल्याने पंचवटीतील सर्व मुख्य तसेच गल्लीबोळातील रस्त्यांवर वाहनांची वर्दळ होती. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या राहणाऱ्या हातगाड्यांवर तसेच भाजीपाला खरेदीसाठी महिलांनीही गर्दी केली होती.

Web Title: Citizens on the streets as soon as the rules are relaxed: Violation of the rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.