गंगापूररोडवर मोकाट जनावरांचा नागरिकांना त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 12:18 AM2019-11-21T00:18:24+5:302019-11-21T00:18:42+5:30
गंगापूर, सोमेश्वर, आनंदवली, सावरकरनगर परिसरात मोकाट जनावरांचा त्रास होत असल्याने परिसरातील नागरिकांसह वाहनचालक त्रस्त झाले आहेत. या मोकाट जनावरांमुळे लहान-मोठे अपघात होऊन दुखापत झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याकडे संबंधित विभाग कानाडोळा करून वेळ ढकलून नेत असल्याचे दिसते.
गंगापूर : गंगापूर, सोमेश्वर, आनंदवली, सावरकरनगर परिसरात मोकाट जनावरांचा त्रास होत असल्याने परिसरातील नागरिकांसह वाहनचालक त्रस्त झाले आहेत. या मोकाट जनावरांमुळे लहान-मोठे अपघात होऊन दुखापत झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याकडे संबंधित विभाग कानाडोळा करून वेळ ढकलून नेत असल्याचे दिसते. गेल्या काही वर्षांपासून कोंडवाडे नामशेष होत चालले असून, शहरात व ग्रामीण भागात मोकाट जनावरांचा वावर आणि उपद्रव वाढला आहे. याचा त्रास सर्वसामान्य जनतेला होत असल्याने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
शहरी व ग्रामीण भागात पशुधन मोठ्या प्रमाणात असल्याने मोकाट जनावरे बाजारपेठेत व मुख्य रस्त्याच्या मधोमध बसत असल्याने नागरिकांना आपली वाहने चालवणे मोठ्या जिकिरीचे झाले आहे. गंगापूररोड, आनंदवली, सोमेश्वर, गंगापूर, गोवर्धन या ठिकाणी रस्त्यावर मोकाट जनावरे बसल्याने रस्त्यावरील वाहनचालकांना आपला जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागतात. जोपर्यंत एखादा अपघात होत नाही तोपर्यंत त्यांचे मालक अदृश्य असतात. दरम्यान एखाद्या वाहनाने या जनावरांना गाडीने उडवले तर सर्व अदृश्य झालेले मालक आपला दावा दाखविण्यासाठी व भांडण करण्यासाठी नेहमी तयार असतात. महापालिका अथवा गोवर्धन ग्रामपंचायत या जनावरांना पकडून कोंडवाड्यात सोडण्याची व मालकांना दंड करण्याची तसदीसुद्धा घेत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. जनावरांनी रस्त्यावर टाकलेल्या विष्ठेवरून दुचाकी वाहने घसरून पडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. नाशिक महापालिका या घटनांकडे सरार्सपणे दुर्लक्ष करत आहे. या मोकाट जनावरांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागल्याची अनेक उदाहरणे आहेत. यावर प्रतिबंध करण्यासाठी महापालिकेने जनावरांना बंदिस्त करण्यासाठी कोंडवाड्याची निर्मिती करावी. मोकाट जनावरांना या कोंडवाड्यात ठेवून त्यांच्या मालकांवर दंड आकारणी करावी, अशी मागणी गंगापूररोड परिसरातील नागरिकांनी केली आहे.
गंगापूररोड, आनंदवली, सोमेश्वर या भागात रस्त्याच्या मध्यभागी मोकाट जनावरे घोळका करून बसतात अन् तिथेच घाण करतात. परिणामी वाहनचालकांना आपली वाहने हळू चालवावी लागतात. त्यामुळे लहान-मोठे अपघात रोज घडतात. महापालिकेने यावर त्वरित कारवाई करायला हवी.
- अरु ण पाटील, रहिवासी
मोकाट जनावरांवर वेळीच कारवाई करायला हवी. जनावरे रस्त्याच्या मधोमध बसल्याने आणि तिथेच घाण केल्याने दुचाकीचालक व चारचाकी चालकांना वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागते. जनावरांना वाचविण्याच्या प्रयत्नात अपघात होतो, त्यामुळे या मोकाट जनावरांवर व त्यांच्या मालकांवर कारवाई करावी.
- सुरेश गायकवाड, आनंदवली