नागरिकांना लवकरच मिळणार मालकी हक्क
By admin | Published: June 30, 2017 12:20 AM2017-06-30T00:20:50+5:302017-06-30T00:21:05+5:30
सिडको : सिडको प्रशासनाच्या वतीने नाशिक येथील कार्यालय ‘पॅकअप’ करण्याच्या हालचाली सुरू असून, येत्या ३१ जुलैपर्यंत येथील राहिलेली कामे आटोपण्याच्या सूचना वरिष्ठांकडून देण्यात आल्या आहेत
नरेंद्र दंडगव्हाळ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सिडको : सिडको प्रशासनाच्या वतीने नाशिक येथील कार्यालय ‘पॅकअप’ करण्याच्या हालचाली सुरू असून, येत्या ३१ जुलैपर्यंत येथील राहिलेली कामे आटोपण्याच्या सूचना वरिष्ठांकडून देण्यात आल्या आहेत. आगस्ट महिन्यापासून कार्यालय बंद करून यापुढील सर्व व्यवहार आॅनलाइन प्रणालीनुसार करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांकडून देण्यात आली आहे.
सिडको प्रशासनाने गेल्या पंचवीस वर्षांपूर्वी शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेत टप्प्याटप्प्याने एक ते सहा योजना बांधल्या असून, या सर्व योजना महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आल्या
आहेत.
सिडकोने सहा योजना मिळून सुमारे पंचवीस हजार घरे बांधली असून, ती ग्राहकांना ९९ वर्षांच्या कराराने दिली आहे. सिडकोने सहाही योजना या मनपाकडे हस्तांतरित केल्या असल्या तरी सिडकोच्या घरांचे बांधकाम करण्यासाठी लागणारी एन.ओ.सी.(ना हरकत दाखला) घेण्यासाठी सिडकोकडेच जावे लागते.
यांसह प्लॉटधारक, प्रकल्पग्रस्तांचे, टपरीधारक आदींचे प्रश्न प्रलंबित असताना सिडकोने येथून काढता पाय घेत येत्या ३१ जुलैपासून कार्यालयच बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्या असून, राहिलेले कामकाज हे आॅनलाइन करण्यात येणार असल्याचे समजते.
गेल्या मार्च महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिडको मालक असलेल्या नवी मुंबईतील सर्व जमिनी फ्री होल्ड कराव्यात, याबाबतचा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात यावा, असे आदेश सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या बैठकीत दिले होते. याच धर्तीवर सिडकोतील २५ हजार घरांना व प्लॉटधारकांना मालकी हक्क देण्याच्या हालचाली सिडकोकडून सुरू असून, याबाबत मुंबई येथे कामकाज सुरू असल्याचे समजते.