मारहाणप्रकरणी सीटूचा मोर्चा
By admin | Published: June 4, 2017 02:44 AM2017-06-04T02:44:51+5:302017-06-04T02:45:01+5:30
सीटू कामगार संघटनेच्या वतीने शनिवारी (दि़३) विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : कंपनी व्यवस्थापनाच्या सांगण्यावरून कामगारांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना नग्न करून मारहाण करणारे वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यातील पाच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करून अटक, तसेच निलंबित करण्याच्या मागणीसाठी सीटू कामगार संघटनेच्या वतीने शनिवारी (दि़३) विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़ यावेळी मोर्चेकऱ्यांनी महानिरीक्षक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी केली़ दरम्यान, शेतकरी आंदोलनात दाखल झालेल्या शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणीही यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली़
गोल्फ क्लब मैदानावरून सकाळी अकरा वाजेच्या सुमारास सीटू संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ़ डी़ एल़ कराड, आमदार जे़ पी़ गावित, जिल्हा उपाध्यक्ष श्रीधर देशपांडे, जिल्हाध्यक्ष सीताराम ठोंबरे, सरचिटणीस देवीदास आडोळे यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चास सुरुवात झाली़ त्र्यंबक नाका, जीपीओ, खडकाळी सिग्नल, सारडा सर्कलमार्गे विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयावर हा मोर्चा नेण्यात आला़
विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांना निवेदन देण्यात आले़ या निवेदनात वाडीवऱ्हे येथील मोनियार रुफिंग कंपनीतील कामगारांनी सीटूचे नेतृत्व स्वीकारल्याने त्यांच्यावर खोटे आरोप, कारणे दाखवा नोटिसा देण्यात आल्या़ गतवर्षी सप्टेंबरमध्ये देवीदास आडोळे व २२ कामगारांविरोधात गुन्हे दाखल करून १७ कामगारांना अटक करण्यात आली़ या कामगारांना कंपनी व्यवस्थापक पवन कासार यांच्या सांगण्यावरून पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर, शीतलकुमार नाईक, देवीदास फड, सचिन पिंगळ व शेख यांनी कामगारांना निर्वस्त्र करून मारहाण केली. त्यामध्ये एका कामगारांचा डोळा अधू झाला़
कंपनी व्यवस्थापनासोबत हातमिळवणी करून कामगारांना मारहाण करणारे वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, चांदवड तालुक्यातील गोगलू अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनी व्यवस्थापकाच्या सांगण्यावरून वडनेर भैरव पोलिसांनी दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत, अशा मागण्या निवेदनाद्वारे विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे करण्यात आल्या आहेत़ या आंदोलनात राज्य उपाध्यक्ष अॅड. वसुधा कराड, कल्पना शिंदे, सिंधू शार्दुल, हरिभाऊ तांबे, संतोष कुलकर्णी, शिवाजी भावले, तुकाराम सोनजे आदिंसह सीटूचे पदाधिकारी आणि कामगार सहभागी झाले होते.