पाटोद्यात उष्णतेने नागरिक हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 06:33 PM2019-04-27T18:33:09+5:302019-04-27T18:33:44+5:30
पाटोदा : तीन दिवसांपासून पाटोदा आणि परिसरात सूर्य आग ओकत असून तपमान ४३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहचले आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले असून लग्न समारंभातील उपस्थितीवरही परिणाम दिसून येत आहे.
पाटोदा परिसरात पारा ४३ अंशावर गेल्याने भरदुपारच्या सुमारास सर्वत्र अघोषित संचारबंदी लागावी तसे रस्ते निर्मनुष्य दिसून येत आहेत. प्रचंड उन्हामुळे जीवाची काहिली होत असल्याने नागरिकांनी थंडपेयांच्या तसेच रसवंतीगृहाचा आसरा घेतला आहे. हवामान खात्यानेही चार पाच दिवस उष्णतेची लाट सांगितलेली असल्याने उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक दक्ष झाले आहेत. रखरखत्या उन्हापासून बचाव करण्यासाठी बाजारात विविध प्रकारच्या टोप्या विक्र ीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. नागरिकांचा गॉगल, टोप्या खरेदीकडे नागरिकांचा कल वाढल्याचे दिसून येत आहे. उन्हाचा कडाका वाढल्यामुळे शरीराला गारवा निर्माण करणाऱ्या द्राक्ष, टरबूज, काकडी या फळांना मागणी वाढली आहे. विविध प्रकारचे ज्यूस, ताक, लस्सी अशा थंडपेयांनादेखील मागणी वाढल्याचे दिसून येत आहे. गेल्या महिन्यातही तपमान ४० अंशाच्या पुढे गेले होते.मात्र मधल्या काही दिवसात पारा हा ३७-३८ अंशाच्या खाली आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र तीन दिवसांपासून पुन्हा पारा प्रचंड वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. कडक उन्हामुळे प्रचंड उकाडा जाणवत असल्यामुळे नागरिक उकाड्यापासून सुटका करण्यासाठी झाडाची सावली तसेच पंखा व कुलरचा आधार घेतांना दिसत आहेत. शुक्रवार व शनिवारी दिवसभर वीज पुरवठा खंडीत असल्याने नागरिकांना प्रचंड उकाड्याचा त्रास सहन करावा लागला. रात्री उशिरा वीज पुरवठा सुरळीत झाल्याने नाजरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. पाटोदा परिसरात तपमान ४३ अंशाच्या पुढे गेल्याने सकाळी सात आठ वाजेपासूनच उन्हाचे चटके लागत असल्याने कामानिमित्त घराबाहेर पडणाºया नागरिकांना टोपी, गॉंगल्स तसेच महिलांना स्कार्प व सनकोट घेतल्याशिवाय घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. दिवसाबरोबरच रात्रीही उकाडा जाणवत असल्याने नागरिकांना बाहेर हवेत बसावे लागत आहे. रात्रीच्या वेळेस डासही प्रचंड त्रास देत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. कडक उन्हामुळे नागरिकांच्या डोळ्यांच्या विकारामध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे.नागरिकांना डोळे येणे, डोळे कोरडे पडणे, डोळे लाल होणे, अलर्जी होणे असे असा त्रास होत आहे. माणसांबरोबरच मुक्या प्राण्यांनाही या उष्णतेचा त्रास होत असून त्यांना विविध आजार जडले आहे.