कामगारविरोधी धोरणाच्या निषेधार्थ सीटूचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 09:23 PM2020-05-25T21:23:31+5:302020-05-26T00:10:11+5:30
सिन्नर : लॉकडाउनमध्ये कामगार, कष्टकरी, स्थलांतरित कामगार, व्यावसायिक, शेतकरी अडचणीत असताना केंद्र व राज्य सरकारने त्यांना आर्थिक मदत केली नाही. कामगारांना लॉकडाउन काळातील वेतन द्यावे, कामगार कपात करण्यात येऊ नये, अशी मागणी करत सीटू संघटनेने माळेगाव, मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील १६ कारखान्यांच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले.

लॉकडाउनमुळे अडकलेल्या कामगार व नागरिकांना त्यांच्या गावी जाण्याची पुरेशी व्यवस्था करावी, त्यांना अन्न पाणी व औषधोपचाराची व्यवस्था करावी, आयकर लागू नसलेल्या प्रत्येक कुटुंबाला साडेसात हजार रुपये थेट रोख मदत द्यावी आदींसह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.
सीटूचे नेते हरिभाऊ तांबे, संतोष कुलकर्णी, भाऊसाहेब ताकाटे, शरद कडभाने, योगेश आनेराव, अशोक भांबर, दत्तात्रेय चव्हाणके, दत्तात्रेय रसाळ, माणिक रानडे, अजित लोखंडे, योगेश अहिरे, प्रवीण झगडे, रवींद्र पठाडे, गोविंद शिंदे, दिगंबर पाळदे, आशिष देशमुख, दत्तात्रेय मुरकुटे, किरण रानडे आदींसह कामगार सहभागी झाले होते. कामगारविरोधी धोरणे मागे न घेतल्यास तीव्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असा इशारा देण्यात आला आहे. कामगारांनी सोशल डिस्टन्सिंग पाळत आंदोलन केले.