शहर बसचे स्टेअरिंग आता मनपाच्या हाती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 01:08 AM2018-09-20T01:08:16+5:302018-09-20T01:09:13+5:30
गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या शहर बस वाहतुकीचा ताबा घेण्यास अखेरीस महापालिकेच्या महासभेत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. तथापि, केवळ प्रशासन आणि ठेकेदार ही सेवा चालवणार नसून परिवहन समितीच ही सेवा संचलित करेल, असा ठराव यावेळी करण्यात आला.
नाशिक : गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या शहर बस वाहतुकीचा ताबा घेण्यास अखेरीस महापालिकेच्या महासभेत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. तथापि, केवळ प्रशासन आणि ठेकेदार ही सेवा चालवणार नसून परिवहन समितीच ही सेवा संचलित करेल, असा ठराव यावेळी करण्यात आला. बुधवारी (दि.१९) झालेल्या महासभेत हा ऐतिहासिक निर्णय सत्तारूढ भाजपाने बहुमताने घेतला. तोट्यामुळे ही बससेवा घेऊ नये यासह गोपनीय मतदानाची विरोधकांची मागणी फेटाळण्यात आली. तसेच विरोधकांचा विरोध मोडीत काढून महापौर रंजना भानसी यांनी हा निर्णय दिला.
तब्बल पाच वेळा फेटाळण्यात आलेला शहर बस वाहतूक ताब्यात घेण्याचा निर्णय अखेरीस सहाव्यांदा मंजूर करण्यात आला. बुधवारी (दि.१८) यासंदर्भात झालेल्या महासभेत आयुक्त तुकराम मुंढे यांनी पाठविलेल्या प्रस्तावाची अनेक नगरसेवकांनी चिरफाड केली. तोट्यातील बससेवेची जबाबदारी स्वीकारू नका अशी भूमिका विरोधकांनी मांडली. तथापि, वाढते शहर आणि सार्वजनिक वाहतुकीची गरज या दोन निकषांवर ही जबाबदारी स्वीकारली असल्याचे महापौरांनी जाहीर केले.
महापालिकेच्या महासभेत सर्वात शेवटी चर्चेला आलेल्या या प्रस्तावाच्या प्रारंभीच सभागृह नेता दिनकर पाटील यांनी शहर बस वाहतूक ही शहराची गरज असून, यासंदर्भातील प्रस्ताव परिवहन समितीसह मंजूर करणार असल्याची भाजपाची भूमिका सभागृह नेता दिनकर पाटील यांनी मांडली. यामुळे विरोधकांनी विशेषत: शिवसेनेने संताप व्यक्त केला. ही धमकीची भाषा असून आमचा निर्णय अगोदर झाला आहे आता तुम्हाला काय करायचे ते करा, अशीही भाषा असल्याचे सांगून अजय बोरस्ते यांनी आक्षेप घेतला तर मनसे गटनेता सलीम शेख यांनी महापौरांचे अधिकार सभागृह नेता वापरत असल्याचे सांगितले.
कॉँग्रेसचे गटनेता शाहू खैरे यांनी संपूर्ण नाशिककर आणि महापालिकेला वेठीस धरणारा हा प्रस्ताव असल्याचे सांगून त्यास कॉँग्रेसचा विरोध असेल, असे सांगितले. या प्रस्तावाबाबत विरोधी पक्षांनी केलेल्या मागणीनुसार गुप्त मतदान घ्यावे, असे त्यांनी सांगितले. गुरुमित बग्गा यांनी, महापालिकेला तोट्याची भरपाई द्या किंवा बससेवा ताब्यात घ्या, अशाप्रकारची मागणी करणाऱ्या महामंडळाची भूमिका चुकीची असल्याचे सांगतानाच ज्या महापालिकांनी बससेवा चालविण्यास घेतली त्या सर्व तोट्यात असल्याचे आकडेवारीसह सांगितले.
पुणे महापालिकेच्या बससेवेचे काम तेव्हा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले ती सेवादेखील तोट्यातच असल्याचे सांगितले. आयुक्तांनी किलोमीटरमागे ठेकेदाराला पैसे देण्याचा प्रस्ताव मांडला असला तरी त्यात किमान ७० कोटी रुपयांचा तोटाच होईल, असे त्यांनी सांगितले. विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी महापालिकेची आर्थिकस्थिती चांगली नाही असे आयुक्त सांगतात मग तोट्यात चालणारी बससेवा घेण्याचा प्रस्ताव कसा काय मांडतात, असा प्रश्न करीत राज्यातील विशेषत: मुख्यमंत्र्यांच्या नागपूर शहरातील तोट्यात गेलेली बससेवेची स्थिती मांडली. तेथे मुख्यमंत्री मदत करत नाही तर नाशिकला काय करतील असा प्रश्न त्यांनी केला. बससेवेमुळे महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करावा लागणार असून त्यामुळे ही सेवा चालवू नये आणि चालवायची असेल तर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ती नफ्यात आणून दाखवावी, असे आव्हान दिले. योगेश हिरे यांनी आयुक्तांच्या प्रस्तावातील परिवहन समिती वगळता असलेल्या त्रुटीच मांडल्या. मुशीर सय्यद, अजिंक्य साने, दीक्षा लोंढे यांच्यासह अन्य अनेक नगरसेवकांनी यावेळी मत व्यक्त केले.
टाकळी येथील प्रभाग क्रमांक १७ मधील आम्रपाली झोपडपट्टीला पाणीपुरवठा करणाºया पाइपलाइन्सची गेल्या दहा महिन्यांपासून दुरुस्ती केली नसल्याचा धक्कादायक प्रकार प्रशांत दिवे यांनी उघड केला. वारंवार मागणी करून दुरुस्ती केली जात नाही मग आयुक्तांच्या गरजेच्या कामाचे (नीडबेस) निकष तरी काय असा प्रश्न करताना दिवे अत्यंत भावुक झाले होते. यामुळे सभागृहही स्तब्ध झाले होते. दूषित पाण्याच्या बाटल्या दाखवून दिवे यांनी हे पाणी अधिकाºयांना पाजा असा आग्रह धरला होता. दिवे यांच्या तळमळीमुळे सभागृहदेखील अवाक् झाले. महापौरांनी दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देतानाच यापुढे अत्यावश्यक कामे टाळल्यास अधिकाºयांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला.
मुंढे यांची बदली झाली की कामे करतो
प्रश्नोत्तराच्या तासाला उद्यानातील राष्टÑपुरुषाचे म्युरल्सची तसेच नाला दुरुस्तीच्या विषयावरून भाजपा गटनेता संभाजी मोरूस्कर यांनी उद्यान अधीक्षक शिवाजी आमले व शहर अभियंता संजय घुगे यांना धारेवर धरले. घुगे यांनी तर या बाबाची म्हणजेच तुकाराम मुंढे यांची बदली होऊ द्या मग सर्व कामे करतो, असे सांगितल्याचे मोरूस्कर यांनी सांगताच सभागृहात हलकल्लोळ माजला. घुगे यांनी आपण अशाप्रकारचे विधान केल्याचा इन्कार केला.
खैरे यांनी फाडला भाजपाचा बुरखा
मुख्यमंत्र्यांनी परिवहन समिती करण्यास हिरवाकंदील दिल्याने बससेवेचे उत्साहात समर्थन करणाºया दिनकर पाटील तसेच भाजपाच्या आमदार सीमा हिरे, देवयानी फरांदे यांनी २००९ मध्ये बससेवा कशी तोट्यात आहे याबाबत तत्कालीन महापौर विनायक पांडे यांना दिलेले पत्रच शाहू खैरे यांनी वाचवून दाखवले. पाटील यांच्या प्रमाणेच त्यावेळी कॉँग्रेसमध्ये असलेले शिवाजी गांगुर्डे, उद्धव निमसे आणि मनसेत असतानाचे शशिकांत जाधव यांचे पत्रच त्यांनी वाचून दाखवले. बससेवेच्या निर्णयानंतर आयुक्त मुंढे यांची बदली
मुख्यमंत्र्यांनी तुकराम मुंढे यांना केवळ शहर बस वाहतूक सुरू
करण्यासाठी पाठविले आहे. एकदा हा प्रस्ताव कार्यवाहीत आला की आयुक्तांची बदली करण्यात येणार आहे, अशी महापालिका वर्तुळात सुरू असलेली चर्चा गुरुमित बग्गा आणि अजय बोरस्ते यांनी उघड स्वरूपात मांडली.
४नागपूरच्या आदेशामुळे दबावाखाली शहराला तोट्यात नेणारा प्रस्ताव आयुक्तांनी मांडल्याचेही बोरस्ते म्हणाले.