नगरसूल येथे कडी-कोयंडा तोडून सत्तर हजारांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 12:11 AM2018-02-25T00:11:36+5:302018-02-25T00:11:36+5:30
नगरसूल येथे वडचामळा परिसरात चोरांनी घरीफोडी करून सत्तर हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली. दोन दिवसांपासून नगरसूल परिसरात चोरट्याचा धूमाकूळ वाढला असून, पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.
येवला : नगरसूल येथे वडचामळा परिसरात चोरांनी घरीफोडी करून सत्तर हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली. दोन दिवसांपासून नगरसूल परिसरात चोरट्याचा धूमाकूळ वाढला असून, पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी होत आहे. नगरसूल येथील कुडके, बोरसे वस्तीवर चोरट्यांनी अनेक ठिकाणी चोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यात वडचामळा परिसरात ईक्बाल शेख यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ईक्बाल शेख, त्यांच्या पत्नी, मुलगी, दोन मुले घरात झोपलेले असताना रात्री १ वाजेच्या सुमारास चोरट्यांनी दाराचा कडी- कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. शेख कुटुंबीयांना माहिती न लागता घराची संपूर्ण झडती घेत पेटीत ठेवलेले रोख दहा हजार रु पये, ईक्बाल यांच्या पत्नीच्या गळ्यातील दोन तोळे सोन्याचे मंगळसूत्र ओरबाडून चोरट्यांनी पळ काढला. पत्नीच्या ओरडण्याने शेख कुटुंब जागे झाले. शेख यांनी तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा केला. गुन्हा दाखल करून वेगाने तपासाची चक्रे फिरवली. मात्र चोर पळून जाण्यात यशस्वी ठरले.
पुढील तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर, नरेंद्र खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक एम. सुरासे करत आहेत. दोन दिवसांपासून नगरसूल परिसरातील विविध भागात चोरट्यांनी चोरीचे प्रयत्न केले असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत असले तरी पोलिसांत कुठलाही गुन्हा दाखल नाही. पोलिसांची गस्त वाढविण्याची जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.