शहराने पांघरली धुक्याची दुलई
By admin | Published: September 27, 2015 12:22 AM2015-09-27T00:22:22+5:302015-09-27T00:23:30+5:30
वातावरणात बदल : पावसाने पुन्हा घेतली विश्रांती
नाशिक : गणेश चतुर्थीनंतर शहरात सुरू झालेल्या पावसाने अचानकपणे विश्रांती घेतली असून, सध्या पहाटेच्या सुमारास शहर धुक्याची दुलई पांघरत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. धुक्यात हरविलेले शहर साडेसहा वाजताच सूर्यकिरणांनी उजळून निघत असल्याचा अनुभव सध्या नाशिककर घेत आहे.
शहराच्या वातावरणात कमालीचा बदल झाल्याचा अनुभव नागरिकांना येत आहे. पहाटे शहराच्या विविध उपनगरांमध्ये दाट धुके व दवबिंंदू पडत आहे. अवघ्या अर्धा तास दाट धुके नागरिकांना पहावयास मिळते. पहाटेची झुंजूमुंजू होताच धुके हटू लागते आणि सूर्याची किरणे हळुवारपणे दाटलेल्या धुक्यातून शहरावर पडत आहेत; मात्र आठ वाजताच सूर्याची किरणे तीव्र होत असून, प्रखर ऊन नाशिकरांना गेल्या तीन दिवसांपासून जाणवू लागले आहे. त्याचप्रमाणे वाऱ्याचे प्रमाणही शहरात कमी झाले असून, एकूणच ‘आक्टोबर हीट’ची चाहूल आतापासूनच जाणवू लागली आहे. भाद्रपद महिन्याचा दुसरा आठवडा संपला असल्याने हळूहळू उन्हाची तीव्रता वाढू लागल्याचे चिन्ह शहरात दिसत आहे. तसेच नऊ वाजेनंतर वातावरणात काही प्रमाणात गारवाही जाणवत असल्याने दुचाकीवरून प्रवास करताना नाशिककरांना थंडी भरत आहे, तर रात्रीचे भोजन आटोपल्यानंतर शतपावलीसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना थंड हवेची मंद झुळूक आल्हाददायक वातावरणाची अनुभूती करून देणारी ठरत आहे. एकूणच निसर्गाच्या बदलत्या हवामान चक्रामुळे सध्या नाशिककरांना आगळा वेगळा वातावरण अनुभवयास मिळत आहे. दिवसाच्या बदलत्या प्रहरानुसार वातावरणाची लयदेखील बदलत जात असल्याचे निदर्शनास येत आहे. पहाटे धुके , दुपारी ऊन, संध्याकाळी गारवा, रात्री थंडी असे वातावरण सध्या शहरात अनुभवयास येत आहे. (प्रतिनिधी)