शहरात खून, घरफोडी, दुचाकीचोरी, मंगळसुत्र ओरबाडण्याचे गुन्हे राजरोसपणे सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 01:31 PM2019-02-11T13:31:25+5:302019-02-11T13:35:18+5:30
नाशिक : शहर व परिसरात कायदा सुव्यवस्थेचा गुन्हेगारांना कुठलाही धाक राहिलेला नसून पोलीस यंत्रणा शहरात लहान गुन्ह्यांपासून खूनासारख्या गंभीर ...
नाशिक : शहर व परिसरात कायदा सुव्यवस्थेचा गुन्हेगारांना कुठलाही धाक राहिलेला नसून पोलीस यंत्रणा शहरात लहान गुन्ह्यांपासून खूनासारख्या गंभीर गुन्हयाच्या घटना रोखण्यास सपेशल अपयशी ठरत आहेत. महिनाभरात सहा खूनाच्या घटना घडल्या असून दुचाकी चोरी, घरफोडी, मंगळसुत्र ओरबाडणारी टोळीदेखील शहरासह उपनगरांमध्ये सक्रीय असल्याचा दाट संशय व्यक्त होत आहे. कारण नागरिकांची बंद घरे व सोसायट्यांमधील वाहनतळात उभी असलेली वाहनेदेखील सुरक्षित राहत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
सातपूर कॉलनीतील बळवंतनगर भागात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी करत घरामधून ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, येथील आनंदछाया सहकारी गृहनिर्माण सोसायटीत भानुदास जगन्नाथ महांगडे हे राहतात. या आठवड्यात त्यांचे बंद घराचे कुलूप अज्ञात चोरट्यांनी तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर कपाटातून ३० हजार रु पयांच्या सोन्याच्या अंगठ्या, आठ हजार रु पयांचे चांदीचे कमरपट्टे, चांदीची थाळी, वाळा, एक हजार रु पयाची रोकड असा ३९हजार रु पयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात अज्ञात संशयितांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक : शहर परिसरातील सीबीएस व मुंबई नाका परिसरातून अज्ञात चोरट्यांनी दोन दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली आहे. मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन दिवसांपुर्वी त्र्यंबकरोड येथून दुचाकी लंपास करण्यात आली होती. तसेच सरकारवाडा पोलिसांच्या हद्दीतूनही काही दिवसांपुर्वी दुचाकी चोरीच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन घटना घडल्या आहेत. शहरात दुचाकीचोरीचा सिलसिला सुरूच असल्याने नाशिककरांनी रस्त्यावर वाहने उभी करणेदेखील धोक्याचे झाले आहे.
पहिल्या घटनेत सोमनाथ हरिभाऊ पिंगळे (रा. देवी मंदिराजवळ, मखमलाबाद) यांची ४० हजार रु पयांची प्लेझर (एम.एच १५सीपी ४२२२) सीबीएसजवळील भुयारी मार्गाच्या वाहनतळामधून अज्ञात चोरट्यांनी पळवून नेली. तसेच दुसऱ्या घटनेत चोरट्यांनी द्वारका येथील नासर्डी पुलाजवळ असलेल्या बनकर मळा भागातील सोसायटीच्या वाहनतळातून ४०हजार रु पयांची पॅशन मोटारसायकल चोरट्यांनी चोरून नेली आहे. येथील झेप अपार्टमेंटमध्ये स्वप्नील रमेश वारे हे राहतात. त्यांनी त्यांच्या सोसायटीच्या वाहनतळात दुचाकी (एम.एच१५ बीझेड १५१३) नेहमीप्रमाणे उभी केली होती.
शहर व परिसरात दुचाकी चोरी करणारी टोळी सक्रीय असल्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने ही टोळी शोधून काढावी असे आवाहन केले जात आहे. शहरातून राजरोसपणे इमारतींच्या वाहनतळातून तसेच गजबजलेल्या परिसरातून दुचाकी पळवून नेल्या जात असताना पोलिसांकडून जुगारी शोधून त्यांच्यावर थातुरमातूर कारवाई केली जात आहे, हे विशेष!