शहराला ८० दिवस पुरेल इतके मुबलक पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 01:55 AM2019-05-14T01:55:13+5:302019-05-14T01:55:31+5:30
नाशिक शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेने मिळवलेल्या आरक्षणातून अत्यंत जपून पाणीपुरवठा केला, तसेच मुकणे योजना अलीकडेच सुरू होत असल्याने किंबहुना ती चाचणी अवस्थेतच बघितली जात असल्याने त्याचा शहराला फायदा होणार आहे.
नाशिक : नाशिक शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेने मिळवलेल्या आरक्षणातून अत्यंत जपून पाणीपुरवठा केला, तसेच मुकणे योजना अलीकडेच सुरू होत असल्याने किंबहुना ती चाचणी अवस्थेतच बघितली जात असल्याने त्याचा शहराला फायदा होणार आहे. गंगापूर, दारणा आणि मुकणे या तीन धरणांतून शहरासाठी अजूनही दीड हजार दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण शिल्लक आहे. पाऊस वेळेत न पडल्यास किंवा अपुरा पाऊस झाल्यास मात्र महापालिकेवर जलसंकट येण्याची शक्यता आहे.
नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात यंदा पुरेसा साठा आहे. जिल्हा प्रशासनाकडे झालेल्या बैठकीत गंगापूर धरणातून ४२००, दारणा धरणातून ४०० तर मुकणे धरणातून ३०० दशलक्ष घनफूट याप्रमाणे ४९०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण ठेवण्यात आले होते. १५ आॅक्टोबर २०१८ पासून हे आरक्षण देण्यात आले होते. १२ मेपर्यंत म्हणजे २१० दिवसांत महापालिकेने गंगापूर धरणातून ३१४७.९१ दशलक्ष घनफूट तर दारणा धरणातून २४१.४६ दशलक्ष घनफूट पाणीपुरवठा केला आहे. अजूनही १५१० दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक आहे अर्थात मुकणे धरणातून थेट जलवाहिनी योजनेसाठी आरक्षण आॅक्टोबर महिन्यातच मिळाले.