सिटी लिंक प्रवाशांना आता क्युआर कोडसहीत ऑफलाईन पास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:20 AM2021-08-28T04:20:09+5:302021-08-28T04:20:09+5:30
नाशिक महानगर परीवहन महामंडळ कंपनीच्या संचालक मंडळाची आढावा बैठक शुक्रवारी (दि.२७) संपन्न झाली. आयुक्त तथा मुख्य व्यवस्थापकीय संचालक कैलास ...
नाशिक महानगर परीवहन महामंडळ कंपनीच्या संचालक मंडळाची आढावा बैठक शुक्रवारी (दि.२७) संपन्न झाली. आयुक्त तथा मुख्य व्यवस्थापकीय संचालक कैलास जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस महापौर तथा संचालक सतीश कुलकर्णी, स्थायी समिती सभापती गणेश गीते, सभागृह नेते कमलेश बोडके, स्मार्ट सिटी कंपनीचे सीईओ सुमंत मोरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थितीत पार पडली. यावेळी महापालिकेचे शहर अभियंता शिवकुमार वंजारी, समन्वयक शिवाजी चव्हाणके, बाजीराव माळी यांच्यासह अन्य मान्यवर अधिकारी उपस्थित होते.
१ सप्टेंबरपासून २५ बस वाढण्यात येणार आहे. ७ मार्गांवर या बसफेऱ्या असतील. त्यामुळे प्रवास करू इच्छिणाऱ्यांना मेाठा लाभ होणार आहे. यापूर्वी मासिक किंवा त्रैमासिक पास ऑनलाईनच उपलब्ध होते. मोबाईलवरील सीटी लिंकच्या ॲपवर ते उपलब्ध होते. मात्र, आता प्रिंटेट पास उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विशेषत: अनेक नागरिक आणि मुख्यत्वे शाळा कॉलेजच्या मुलांकडे मोबाईल नसल्यास पास देणे अडचणीचे होते, त्यामुळे आता प्रिंटेड पासदेखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शाळकरी मुलांना ५० टक्के तर प्रौढ प्रवाशांना मासिक तसेच त्रैमासिक पाससाठी ३३ टक्के सवलत देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रिटेंड पास देण्यात येणार आहे. त्यावर क्यूआर कोड असेल. त्यामुळे डुप्लिकेट पास तयार केले तरी ते उपयोगात येणार नाही, असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. महापालिकेतील बदललले अधिकारी तसेच पदाधिकारी यांच्या जागी अन्य नूतन संचालकांची नियुक्त करण्यात आली तसेच कंपनीसाठी सीए नियुक्त करणे तसेच कंपनीच्या आर्थिक व्यवहारांसाठी सह्यांचे अधिकार देणे अशा विविध कामांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले.
इन्फो...
या सात मार्गांवर सुरू हेाणार बससेवा...
१) तपोवन ते भगूरमार्गे शालिमार, द्वारका, जयभवानी रोड ते देवळाली कॅम्प
२) सीबीएस ते सायखेडामार्गे ओढा- लाखलगाव
३) तपोवन ते म्हाडामार्गे सिव्हील, सातपूर
४) नाशिक रोड ते सिम्बॉयसिस कॉलेजमार्गे सीबीएस, पवननगर, उत्तम नगर
५) नाशिकरोड ते मखमलाबादमार्गे सीबीएस, मालेगाव स्टँड,हनुमानवाडी, शांतीनगर
६) सीबीएस ते मोहाडीमार्गे आडगाव
७) गंगापूर ते सिद्धप्रिंपीमार्गे निमाणी, गंगापूररोड, आडगांव
इन्फो...
महापालिकेची सेवा तेाट्यातच पण
नाशिक महापालिकेची सेवा तोट्यात असली तरी सध्या राज्यात सर्वाधिक किफायतशीर असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. नाशिक महापालिकेला ५१ बसचे ३७ रूपये प्रति किलेामीटर सरासरी उत्पन्न मिळत आहे. त्या तुलनेत पुणे, औरंगाबाद, ठाणे, मुंबई येथील सेवांमध्ये सरासरी प्रति किलो मीटर पेक्षा महापालिकेचे उत्पन्न अधिक आहे.