मनमाड शहराला चार महिने पुरेल एवढा पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2021 12:34 AM2021-12-28T00:34:11+5:302021-12-28T00:35:06+5:30
मनमाड : शहराचा पाणीप्रश्न हा सर्वदूर परिचित आहे. मात्र, पावसाळ्यात झालेल्या वरुणराजाची कृपा आणि अवकाळी पावसामुळे पाणीटंचाईचा प्रश्न मिटला आहे. सध्या मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणात चार महिने पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध असून, पालखेड धरणाचे दोन आवर्तन बाकी असल्याने उन्हाळ्यात पाण्यासाठी नागरिकांची पायपीट होणार नाही.
मनमाड : शहराचा पाणीप्रश्न हा सर्वदूर परिचित आहे. मात्र, पावसाळ्यात झालेल्या वरुणराजाची कृपा आणि अवकाळी पावसामुळे पाणीटंचाईचा प्रश्न मिटला आहे. सध्या मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणात चार महिने पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध असून, पालखेड धरणाचे दोन आवर्तन बाकी असल्याने उन्हाळ्यात पाण्यासाठी नागरिकांची पायपीट होणार नाही.
गेल्या काही वर्षांपासून पाणीटंचाईमुळे मनमाड पुरते हैराण झाले होते. चांगला पाऊस न झाल्यामुळे धरण भरले जात नव्हते. त्यामुळे पंधरा, पंचवीस तर एकावर्षी पंचावन्न दिवसाआड पाणीपुरवठा झाला होता. यंदाही तशीच परिस्थिती होती. पाऊस पाहिजे तसा झाला नाही. मात्र, शहराला आवर्तन देणाऱ्या धरणसमूहात चांगला पाऊस झाल्याने आणि शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघदर्डी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अवकाळी पाऊस चांगला झाल्यामुळे पाणीसाठ्यात वाढ होऊन धरण ओव्हर फ्लो झाले होते. तर बाकी असलेले पालखेड धरणाचे आवर्तनही उचलण्यात आल्याने पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे आजच्या घडीला धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे.
शहराला एकवेळा पाणीपुरवठा करण्यासाठी चार दशलक्ष घनफूट पाणी लागते. यावर्षी मनमाडकरांना पाण्यासाठी वणवण भटकत पायपीट करावी लागली नाही की पाणी विकत घेण्याची वेळ आली नाही. पाणीपुरवठ्याचे दिवसदेखील कमी करण्यात आले आहेत. मागील काही वर्षांच्या पाणीटंचाईवेळी होणारी पाणीटंचाई यंदा जाणवली नाही.
इन्फो
वागदर्डीत ७० दलघक्ष पाणीसाठा
शहरात रेल्वे इंजिन कारखाना, खाद्य निगमचे गोडाऊन, जंक्शन स्थानक आणि शीख बांधवांच्या तिसऱ्या क्रमांकाच्या गुरुद्वारामुळे देशभरात मनमाड शहर प्रसिद्ध असून, दुष्काळग्रस्त तालुका आणि पाणीटंचाईचे गाव म्हणून मनमाड शहराची ओळखदेखील आहे. मात्र, यंदा झालेल्या पावसामुळे धरणात मुबलक पाणी असल्याने मनमाडकर समाधानी आहेत. सध्या पाटोदा येथील साठवण तलावात १०.५ फूट अर्थात १० दशलक्ष घनफूट पाणी, तर वागदर्डी धरणात ६५.५ फूट अर्थात ७० दशलक्ष पाणीसाठा उपलब्ध आहे.
सध्या उपलब्ध असलेला पाणीसाठा आणि चार महिने अर्थात मार्चपर्यंत पुरेल तर त्यानंतर जानेवारी आणि एप्रिल या महिन्यात शहरासाठी राखीव असलेले पिण्याच्या पाण्याचे आवर्तन मिळणार आहे. यामुळे उपलब्ध पाणीसाठा आणि मिळणारे आवर्तन यामुळे उन्हाळा पार होऊ शकतो. त्यामुळे पाणीटंचाईचे सावट सध्या तरी नाही.
- डॉ. विजयकुमार मुंढे, मुख्याधिकारी.
(२७ मनमाड वॉटर १, विजय मुंढे)
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणात असलेला पाणीसाठा.