शहरात आता कोरोना लसीकरणाची वीस केंद्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:16 AM2021-03-10T04:16:02+5:302021-03-10T04:16:02+5:30
नाशिक : शहरातील ज्येष्ठ नागरिक आणि कोमार्बिड नागरिकांच्या लसीकरणासाठी खासगी रुग्णालयात अद्याप नियमितपणे कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध होण्यात येत ...
नाशिक : शहरातील ज्येष्ठ नागरिक आणि कोमार्बिड नागरिकांच्या लसीकरणासाठी खासगी रुग्णालयात अद्याप नियमितपणे कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध होण्यात येत असलेली अडचण लक्षात घेता महापालिकेने शहरातील लसीकरण केंद्रांची संख्या वाढवली असून ती आता २० वर नेण्यात आली आहे. त्यामुळे आता अनेक भागांत घराजवळ लस उपलब्ध होणार आहे.
नाशिक जिल्ह्यात आणि शहरात १६ जानेवारीस लसीकरणाचा पहिला टप्पा सुरू झाला. त्यात आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात फ्रंट वर्कर म्हणून महापालिकेचे इतर कर्मचारी व पोलीस यांचा समावेश करण्यात आला. तर तिसऱ्या टप्प्यात १ मार्चपासून ६० वर्षांवरील ज्येष्ठांसह ४५ वर्षांपुढील व्याधीग्रस्त नागरिकांचे लसीकरण करण्याचे जाहीर करण्यात आले. त्यासाठी राज्य शासनाने शासकीय आरोग्य योजनांचा लाभ असलेल्या खासगी रुग्णालयांची निवड केली असली तरी अनेक रुग्णालयांना त्यांची नावे जाहीर झाल्यानंतर त्याबाबत माहिती मिळाली. त्यानंतरही योग्य नियोजन, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण याकरिता लवकर केंद्र सुरू झालेले नव्हते ते सुरू झाले असले आणि नंतर खासगी रुग्णालयांना अडीचशे रुपयांत लस घेण्याची मुभा असली तरी अद्याप सर्वत्र लस उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे काही मोजक्याच केंद्रांवर ही व्यवस्था करत लसीकरणास सुरुवात करण्यात आली.
शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्यानंतर आता नागरिकांकडून लसीकरणासाठी विचारणा होत असून त्यामुळेच नागरिकांची सोय बघता महापालिकेच्या वतीने तीन केंद्रांच्या पुढे जाऊन आता २० ठिकाणी लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली.
इन्फो...
शहरातील विभागनिहाय लसीकरण केंद्रे
शहरात महापालिकेच्या २० आणि खासगी १६ रुग्णालयांत लसीकरण सुरू आहे. महापालिकेच्या वतीने सातपूर येथील ईएसआयएस रुग्णालय, रविवार कारंजा येथील रेडक्रॉस, पंचवटीतील मायको, रामवाडी, उपनगर, सिडको, पिंपळगाव खांब, वडाळा गाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, नाशिक रोड येथील जेडीसी बिटको, इंदिरा गांधी रुग्णालय, नवीन बिटको रुग्णालय, गंगापूर रुग्णालय, अंबड, मखमलाबाद, भारतनगर, दसक पंचक, एमएचबी कॉलनी, मायको सातपूर, सिन्नर फाटा, जिजामाता प्राथमिक आरोग्य केंद्र येथे लसीकरणाची व्यवस्था आहे.