कोरोनापासून स्वत:ला सुरक्षित ठेवण्यास शहर पोलिसांना यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 12:20 AM2020-05-28T00:20:34+5:302020-05-28T00:21:55+5:30
एकीकडे राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव हा पोलिसांसाठी घातक ठरत असून, राज्यात बाधित पोलिसांची संख्या एक हजार ९६४वर पोहोचली आहे, तर दुसरीकडे मालेगावी बंदोबस्त पार पाडत असताना सुमारे दीडशे पोलिसांना कोरोनाची बाधा झाली. त्यापैकी १२ पोलिसांनी कडवी झुंज देत कोरोनावर मात केली. दरम्यान, शहर पोलीस आयुक्तालयाच्या पोलीस दलाने अद्याप कोरोनाला थोपवून धरले असून, हे शुभ वर्तमान मानले जात आहे. शहर पोलिसांनी शहरात पहारा देताना स्वत:ची अधिकाधिक खबरदारी घेत कोरोनाचे संक्रमण अद्याप टाळले आहे.
अजहर शेख। लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : एकीकडे राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव हा पोलिसांसाठी घातक ठरत असून, राज्यात बाधित पोलिसांची संख्या एक हजार ९६४वर पोहोचली आहे, तर दुसरीकडे मालेगावी बंदोबस्त पार पाडत असताना सुमारे दीडशे पोलिसांना कोरोनाची बाधा झाली. त्यापैकी १२ पोलिसांनी कडवी झुंज देत कोरोनावर मात केली. दरम्यान, शहर पोलीस आयुक्तालयाच्या पोलीस दलाने अद्याप कोरोनाला थोपवून धरले असून, हे शुभ वर्तमान मानले जात आहे. शहर पोलिसांनी शहरात पहारा देताना स्वत:ची अधिकाधिक खबरदारी घेत कोरोनाचे संक्रमण अद्याप टाळले आहे.
कोरोनाचा फटका राज्यातील पोलीस दलासही बसत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण पोलीस दलातील तीन कोरोनाबाधित पोलिसांचा मृत्यू झाला. मात्र शहर पोलिसांनी घेतलेली खबरदारी आणि नियोजनामुळे शहर पोलीस दलातील सर्व अधिकारी व कर्मचारी हे अद्याप तरी कोरोनापासून सुरक्षित राहिले आहे.
शहर पोलिसांनीही कोरोनाचा धोका ओळखून सुरुवातीपासूनच चोख नियोजन केले. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सुरुवातीपासूनच ५० वर्षांवरील पोलिसांना गर्दीच्या ठिकाणांपासून बंदोबस्तासाठी दूर ठेवले. नियंत्रण कक्षातून वेळोवेळी दूरध्वनीद्वारे अधिकारी संपर्क साधत ५०पेक्षा अधिक वयाच्या कर्मचारी वर्गाची तब्येतबाबत विचारपूस करत आढावा घेत होते. आठ तास सेवा बजावल्यास पोलिसांचे शारीरिक व मानसिक आरोग्य टिकवून राहण्यास मदत होते ही बाब ओळखून प्रत्येक कर्मचाऱ्यास नांगरे पाटील यांनी ८ तास बंदोबस्त कसा वाट्याला येईल याचे चोखपणे नियोजन केले. कर्तव्यावरील पोलिसांना सतत गरम पाणी मिळावे यासाठी सर्वांना थर्मा फ्लॅक्स देण्यात आले.
नुकेतच शहर पलिीस कर्मचाऱ्यांना स्मार्ट घड्याळे देण्यात आली आहेत. यातून शरीराचे तापमान, रक्तदाब आदी बाबींची नोंद होते. सर्व्हरद्वारे ही माहिती पोलीस मुख्यालयास पुरविली जात आहे, अशा एक ना अनेक प्रयोगांमुळे शहर पोलीस अद्याप कोरोनापासून सुरक्षित राहिले असून, यापुढेही राहतील असा आशावाद मुख्यालयाच्या उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांनी व्यक्त केला आहे.
...म्हणून रोखता आला कोरोनाचा शिरकाव
शहरातील बहुतांश पोलीस ठाण्यांच्याबाहेर सॅनिटायझेशन कक्ष उभारले गेले. आरोग्य यंत्रणेच्या पथकासोबत बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांना कोरोनाचा रुग्ण शोधत असताना तसेच पीपीई किटदेखील पुरविले गेले. पोलिसांची वेळोवेळी आरोग्य तपासणी, फिरती मोबाइल सॅनिटायझेशन व्हॅन, रोगप्रतिकारशक्ती वाढविणाºया गोळ्या-औषधांचा पुरवठा, सॅनिटायझर, हातमोजे, मास्कची मुबलक उपलब्धता, प्रत्येक पोलिसाला स्वत:च्या काळजीच्या विशेष सूचना अशा विविध स्तरावर करण्यात आलेल्या प्रयत्नांमुळे शहर पोलीस दलात कोरोनाचा शिरकाव होऊ दिला नाही.