सायकल बचावसाठी ‘सिटी रायडिंग’ उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 12:00 AM2020-01-04T00:00:57+5:302020-01-04T00:47:11+5:30
स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या स्मार्ट बायसिकल शेअरिंग प्रकल्पाला घरघर लागल्याने आता हा प्रकल्प वाचविण्यासाठी नाशिक सायकलिस्टने विविध उपक्रम हाती घेतले असून, नागरिकांमध्ये सायकलविषयक जागृती करण्यासाठंी येत्या २६ जानेवारीला ‘सिटी रायडिंग’ म्हणजेच सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.
नाशिक : स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या स्मार्ट बायसिकल शेअरिंग प्रकल्पाला घरघर लागल्याने आता हा प्रकल्प वाचविण्यासाठी नाशिक सायकलिस्टने विविध उपक्रम हाती घेतले असून, नागरिकांमध्ये सायकलविषयक जागृती करण्यासाठंी येत्या २६ जानेवारीला ‘सिटी रायडिंग’ म्हणजेच सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.
स्मार्ट सिटीच्या कार्यालयात शुक्रवारी (दि.३) पब्लिक बायसिकल शेअरिंगला प्रोत्साहन देण्यासाठी नाशिक सायकलिस्टच्या टीमची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सार्वजनिक वाहतुकीला पर्याय म्हणून सायकल चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम ठरविण्यात आले. या बैठकीस स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल, नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष रत्नाकर आहेर, उपाध्यक्ष सोफिया अंद्राडे कपाडिया यांच्यासह अन्य अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. सायकल चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘ती’ (इंग्रजीत एसएचई म्हणजेच स्पोर्टस हेल्थ एन्व्हायरमेंट) या संकल्पनेवर आधारित मोहीम राबविण्यात येणार आहे. परंतु प्रत्यक्षात ती म्हणजे महिला जर या चळवळीत सहभागी असतील तर मोहीम प्रभावी ठरेल, असा विचार मांडण्यात आला. येत्या २५ जानेवारी रोजी शहरातील ‘सिटी रायडिंग’ म्हणजेच सायकलफेरी करून सायकल वापराचा संदेश देण्यात येणार आहे. याशिवाय एक दिवस वाहन विरहित घोषित करून त्यादिवशी जास्तीत जास्त नागरिकांनी फक्त सायकलचा वापर करण्यात यावा, असे नागरिकांना आवाहन करण्यात येणार आहे. तसेच नाशिक सायकलिस्ट असोसिएशनला यंदा नववा पेलोटेन आयोजनात स्मार्ट सिटी सहकार्य करणार आहे. या पेलोटेनला स्पर्धात्मक स्वरूप नसेल. यात ग्रीन राइड, कॉर्पोरेट राइड आणि किड्स राइड अशा प्रकारच्या सायकल स्पर्धा असणार आहेत.
व्हिडीओ मेकिंग स्पर्धेची घोषणा
सायकल जागृती वाढविण्यासाठी स्मार्ट सिटी व्हिडीओ मेकिंग स्पर्धेची घोषणा यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांनी केली. स्मार्ट सिटी पब्लिक बायसिकल शेअरिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या सायकलींच्या वापरासंदर्भातच हा व्हिडीओ बनवावा लागणार आहे. इच्छुकांनी व्हिडीओ तयार करून ते २० जानेवारीपर्यंत सायंकाळी ५ वाजेपर्यंत स्मार्ट सिटी कार्यालयात जमा करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे.