सटाणा शहर साथीच्या आजाराने ग्रासले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:10 AM2021-06-21T04:10:51+5:302021-06-21T04:10:51+5:30
आरोग्याच्या नावाखाली पालिकेच्या तिजोरीतून मोठ्या प्रमाणात अपहार होत असल्याने जिल्हाधिका-यांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घ्यावी. याबाबत सटाणा शहर महाविकास ...
आरोग्याच्या नावाखाली पालिकेच्या तिजोरीतून मोठ्या प्रमाणात अपहार होत असल्याने जिल्हाधिका-यांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घ्यावी. याबाबत सटाणा शहर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांना निवेदन दिले आहे.
याबाबत माजी नगराध्यक्ष विजयराज वाघ, भारत खैरनार, डॉ. व्ही.के. येवलकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे, शहरप्रमुख जयप्रकाश सोनवणे, रत्नाकर सोनवणे, किशोर कदम, यशवंत कात्रे, मोहन खैरनार आदींनी जिल्हाधिका-यांना निवेदन पाठविले आहे. निवेदनात म्हटले आहे की, सटाणा शहरात साथीच्या आजारामुळे शहरातील सर्व खासगी रुग्णालये रुग्णांनी फुल्ल झाली आहेत. मात्र, यावर कोणत्याही उपाययोजना करण्यास पालिका प्रशासन असमर्थ ठरत आहे. खासगी जागेत औषधफवारणी केली जात नाही. शहरात सार्वजनिक स्वच्छतेचे बारा वाजले असून कचरा, पाण्याची डबकी, रस्त्याच्या कडेने वाढलेले गवत, तुंबलेले नाले, उघड्यावर वाहते गटारे हेच सगळ्या शहराचे चित्र झाले आहे. शहरातील साथीच्या आजारांबाबत प्रशासनाने तातडीने पावले उचलून डेंगी, मलेरिया, चिकनगुनिया आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
इन्फो
...तर ‘ताला ठोको’ आंदोलन!
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्यावरही टीकास्त्र सोडत आराेप केले आहेत. पालिका प्रशासनाने डेंगी, मलेरिया, चिकनगुनिया यासारखे साथीचे आजार आटोक्यात आणण्यासाठी येत्या आठ दिवसांत तातडीने उपाययोजना केल्या नाहीत, तर महाविकास आघाडीतर्फे पालिका कार्यालयाला कुलूप लावून 'ताला ठोको' आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.