सिन्नर पोलिस, दंगा नियंत्रण पथकाच्या जवानांचे शहर, उपनगरांतून संचलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 02:59 PM2020-07-28T14:59:22+5:302020-07-28T15:02:35+5:30
सिन्नर:वाढती रुग्ण संख्या रोखण्यासाठी सिन्नर शहरात गेल्या ६ दिवसांपासून लॉकडाऊन सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर सिन्नर पोलीस आणि दंगा नियंत्रण पथकाच्या जवानांनी संपूर्ण सिन्नर शहरातून आणि उपनगरांंतून संचलन करत शहरवासीयांना नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले.
सिन्नर : वाढती रुग्ण संख्या रोखण्यासाठी सिन्नर शहरात गेल्या ६ दिवसांपासून लॉकडाऊन सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर सिन्नर पोलीस आणि दंगा नियंत्रण पथकाच्या जवानांनी संपूर्ण सिन्नर शहरातून आणि उपनगरांंतून संचलन करत शहरवासीयांना नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले.
शहरातून सकाळी ११ वाजेच्या सुमारास पोलीस निरिक्षक साहेबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नर पोलीस आणि दंगा नियंत्रण पथकाच्या जवानांच्या तुकडीचे संचलन सुरू करण्यात आले. पोलीस स्टेशन पासून उपजिल्हा रुग्णालय, नगरपालिका कॉर्नर, शिवाजी चौक, काजीपुरा, तानाजी चौक, भिकुसा कॉर्नर, लाल चौक, सिन्नर बस स्थानक, शिवाजीनगर, आडवा फाटा, हॉटेल अजिंक्यतारा आणि इतर उपनगरांतील परिसरात जात पोलिसांनी आपल्या कुमकचे दर्शन शहरवासीय आणि उपनगरातील रहिवाशांना घडवले. दरम्यान संपूर्ण शहर बंद असतानाही अनेक ठिकाणी दुचाकी, चारचाकी वाहनातून नागरिक विनाकारण फिरत असल्याने पोलिसांकडून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. कामाशिवाय बाहेर पडणारे आणि विना मास्क फिरणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असून कलम १८८ अन्वये गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. तर नगरपालिका प्रशासनाकडून नियम मोडणार्यांकडून दंडही वसूल केला जात आहे. हवालदार अंकुश दराडे, किरण पवार, दीपक शार्दुल, उल्हास धोंगडे यांनी रुट मार्चचे नियोजन केले. जागोजागी असलेली पोलिसांचीही नाकाबंदी नागरिकांना नियमांचे महत्त्व पटवून देत असून कामाशिवाय बाहेर न पडण्याचे आवाहन करत आहे. शहरात कोरोना रुग्णांची वाढती रुग्ण संख्या डोकेदुखी बनली असून प्रत्येकाने आपापली काळजी घ्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.