फुकट्या जाहिरातदारांमुळे शहर विद्रुप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:42 AM2021-01-08T04:42:48+5:302021-01-08T04:42:48+5:30
नाशिक : कोरोनाचे संकट कमी होत असतानाच महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून, ठिकठिकाणी राजकीय पक्षांचे फलक लागल्याने ...
नाशिक : कोरोनाचे संकट कमी होत असतानाच महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून, ठिकठिकाणी राजकीय पक्षांचे फलक लागल्याने शहराच्या विद्रुपीकरणात भर पडली आहे. शहरात फलक लावू नये यासाठी उच्च न्यायालयाने वेळोवेळी आदेश दिल्यानंतरदेखील महापालिकेकडून फौजदारी कारवाई करण्यात येत नसल्याने राजकीय पक्ष कार्यकर्त्यांचे फावले आहे.
नाशिकमध्ये फलक प्रकरण हे केवळ स्वस्तात प्रसिद्धीचे माध्यम नाही. त्यातून निर्माण झालेल्या स्पर्धेतून नाशिकमध्ये खूनदेखील पडले असून, वेळोवेळी तणावदेखील निर्माण झाले आहेत. नाशिकमध्ये नाशिक सिटिझन फोरम या संस्थेने सर्वप्रथम उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावेळी उच्च न्यायालयाने फलक हटवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर वेळोवेळी असे आदेश देण्यात आले आहेत; परंतु सार्वत्रिक निवडणुकांचा आदर्श आचारसंहितेचा एक काळ वगळला तर शहरभर फलक लागलेले असतात. शुभेच्छा, अभिनंदन आणि त्यानंतर आता दशक्रिया विधी तसेच वर्षश्राध्दाचे फलकही लागतात; परंतु प्रशासनाकडून त्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही.
--------------
प्रशासनाच्या डुलक्या
उच्च न्यायालयाने राजकीय फलक हटवण्याचे आदेश दिल्यानंतरदेखील महापालिका या विषयावर थंड आहे. यापूर्वी महापालिकेने राजकीय फलकांसाठी जागा निश्चित केल्या आणि आकारदेखील ठरवून चौकटी लावल्या; परंतु त्याचा वापर हाेत नाही.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने विभागनिहाय समित्या, हेल्पलाइन अशी सर्व व्यवस्था केली. परंतु नंतर कालौघात या सर्व यंत्रणा ठप्प झाल्या आहेत. त्यामुळे फलक वाढू लागले आहेत.
..........
मनपाने शहरात फलकांसाठी एकूण सत्तर जागा निश्चित केल्या आहेत. त्या ठिकाणी दहा बाय दहाच्या जागा असून त्यातून ३४५ रुपये प्रतिदिन उत्पन्न मिळत आहे. गेल्यावर्षी त्यातून महापालिकेला पाच लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले होते. खासगी जागेवर एका दिवसाचे जेमतेम शंभर रुपये जाहिरात कर आकारला जातो. मात्र, खासगी बेकायदा फलकांचे कोणतेही शुल्क मिळत नाही.
...........
शहरातील फलक हटवण्यासाठी लवकरच कारवाई सुरू करण्यात येणार आहे. मध्यंतरी कोरोनामुळे मनपाची सर्व यंत्रणा वेगळ्या व्यवस्थेत अडकली होती. मात्र आता फलक हटवण्याची करवाई सुरू करण्यात येणार आहे.
- प्रदीप चौधरी, उपआयुक्त विविध कर वसुली विभाग, मनपा
-----------
शहर सौंदर्यीकरण ही सर्वांचीच जबाबदारी आहे. चौक, वाहतूक बेटे ही चांगली ठेवली पाहिजे. मनपाने निर्धारित केलेल्या जागीच फलक लागले तर शहराच्या सौंदर्याला बाधा येणार नाही
- सुनील भायभंग, माजी अध्यक्ष,
नाशिक सिटिझन फोरम