संततधार पावसाने शहर जलमय

By Admin | Published: July 15, 2017 12:10 AM2017-07-15T00:10:05+5:302017-07-15T00:12:24+5:30

नाशिक : जूनमध्ये चांगली सुरुवात केल्यानंतर मध्यंतरी काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने नाशिक शहर व परिसरात गुरूवारी मध्यरात्रीपासून जोरदार हजेरी लावलेली

The city is submerged by the continuous rain | संततधार पावसाने शहर जलमय

संततधार पावसाने शहर जलमय

googlenewsNext

नाशिक : जूनमध्ये चांगली सुरुवात केल्यानंतर मध्यंतरी काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने नाशिक शहर व परिसरात गुरूवारी मध्यरात्रीपासून जोरदार हजेरी लावलेली. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास आणखी मुसळधार पाऊस सुरू झाल्याने अवघे शहर जलमय झाले. सकाळी १० वाजेपर्यंत शहरातील सिडको, पंचवटी, सातपूर, इंदिरानगर, नाशिकरोड परिसरांत पावसाचा जोर कायम होता. दुपारी काहीकाळ पावसाने विश्रांती घेतली तरी नंतर मात्र रिपरिप सुरूच होती. त्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. अनेक ठिकाणी भाजीबाजारात पाणी शिरले. पावसामुळे रस्त्यावर पाणी साचल्याने नागरिकांना कसरत करत मार्गक्र मण करावे लागत होते. पावसामुळे शुक्र वारी दिवसभर सूर्यदर्शनही झाले नाही. शुक्रवारी दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
सिडको परिसरात जनजीवन विस्कळीत
लोकमत न्यूज नेटवर्क :
सिडको : मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे सिटी सेंटर मॉलसमोरील रस्त्यासह सिडको भागातील मुख्य रस्ते जलमय झाल्याने वाहतूक करताना वाहनधारकांना अडचणी निर्माण झाल्या होत्या. याबरोबरच भाजीबाजारामध्ये पाणी शिरल्याने विक्रेत्यांचे हाल झाले असून, जनजीवन विस्कळीत झाले.
सिडको भागात दरवर्षी गणेशचौक, उपेंद्रनगर, तानाजी चौक, बाजीप्रभू चौक यांसह अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरते, परंतु मनपाच्या बांधकाम विभागाच्या वतीने यंदा पावसाळा सुरू होण्याआधी अनेक ठिकाणी पाणी जाण्यासाठी मार्ग केल्याने तसेच नालेसाफसफाई केल्याने अद्यापतरी नागरिकांच्या घरात पाणी शिरले नसल्याचे दिसून आले.
मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे सिडको भागातील बडदेनगर, लेखानगर, गणेश चौक, राणेनगर, शिवाजी चौक, पवननगर, त्रिमूर्ती चौक याबरोबरच सिटी सेंटर मॉलसमोर, संभाजी चौक आदी भागांतील मुख्य रस्त्यांवर पावसाचे पाणी साचल्याने रस्ते जलमय झाले होते. या पाण्यातून वाहनधारकांना मार्गक्रम करणे कठीण होत होते, तर काही दुचांकीमध्ये बिघाड झाल्याचे दिसून आले. सिडकोतील शिवाजी चौक, दत्तचौक, उपेंद्रनगर, पवननगर, त्रिमूर्ती चौक आदी ठिकाणच्या भाजीबाजारात पावसाचे पाणी शिरल्याने विक्रेत्यांच्या मालाचे नुकसान झाले. तसेच एकदंतनगर येथील शनिमंदिर उद्यान, मंगलमूर्ती येथील उद्यानासह सिडको भागातील उद्यानांमध्येदेखील पावसाचे पाणी साचल्याने मुलांना खेळण्यास अडचणी येत आहे.
गोदावरीला पूरसदृश परिस्थिती
लोकमत न्यूज नेटवर्क
पंचवटी : शुक्रवारी पहाटेपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने गोदावरी नदीला पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. नदीकाठालगत अनेक छोटे-मोठे व्यावसायिक तसेच हातगाडीधारक विविध व्यवसाय करीत असल्याने त्यांनी पाण्याची वाढती पातळी बघून आपापल्या टपऱ्या तसेच हातगाड्या सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम सुरू केले होते. पुराच्या पाण्याने रामकुंड, मनपा वाहनतळ तसेच भाजीबाजार पाण्याखाली गेल्याने परिसरातील जनजीवन काहीकाळ विस्कळीत झाले होते. पुराच्या पाण्यात दरवर्षीच टपऱ्या, हातगाड्या वाहून जात असल्याने व्यावसायिकांचे मोठे नुकसान होते.  पुराच्या पाण्यात नुकसान होऊ नये यासाठी विविध व्यवसाय करणाऱ्यांनी सावधानता म्हणून सकाळच्या सुमाराला टपऱ्या, हातगाड्या सुरक्षितस्थळी काढून ठेवण्याचे काम सुरू केले होते. मनपा वाहनतळ, गाडगे महाराज पुलाखालील परिसर, रामसेतू पूल तसेच रामकुंड परिसरातील व्यावसायिकांनी शुक्र वारी दुपारी टपऱ्या हलवून त्या सुरक्षितस्थळी नेण्याचे काम करीत असल्याचे दिसून आले.
सातपूर मनपासमोर तळे

लोकमत न्यूज नेटवर्क :
सातपूर : मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे मनपाच्या सातपूर विभागीय कार्यालयासमोरच पाणी तुंबल्याने संपूर्ण रत्यावर पाण्याचे तळे निर्माण झाले होते. दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे मुख्य रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. गुरुवारी रात्रभर आणि शुक्र वारी दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे सातपूर परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. मुसळधार पावसामुळे नाशिक -त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील पपया नर्सरी चौकात पाणी साचल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. तसेच बॉश कंपनीजवळ पाणी साचल्याने औद्योगिक वसाहतीकडे जाणारी वाहतूक एकेरी मार्गाने वळविण्यात आली होती. महापालिकेच्या विभागीय कार्यालयासमोर पावसाचे पाणी साचून तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. आयटीआय पुलावर पाणी साचल्याने काहीकाळ वाहतूक बंद झाली होती. साचलेले पाणी वाहून जावे म्हणून मनपातर्फे तात्पुरती व्यवस्था करण्यात आली. पाण्यातून जाणारी वाहने बंद पडत होती. पावसामुळे स्वारबाबानगरमधील काही घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले होते. घरात शिरलेल्या पाण्यामुळे तेथील रहिवाशांचे हाल झाले.

Web Title: The city is submerged by the continuous rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.