वणी शहर रात्रभर अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:17 AM2021-07-14T04:17:31+5:302021-07-14T04:17:31+5:30
वणी : येथील ३३ केव्ही उपकेंद्रातील विद्युत पुरवठा करणाऱ्या यंत्रसामग्रीतील रिलेमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने रात्रभर वणीकरांना अंधारात राहावे लागले. ...
वणी : येथील ३३ केव्ही उपकेंद्रातील विद्युत पुरवठा करणाऱ्या यंत्रसामग्रीतील रिलेमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने रात्रभर वणीकरांना अंधारात राहावे लागले. वणी-दिंडोरी रस्त्यावर संखेश्वर मंदिरासमोर ३३ केव्हीचे उपकेंद्र आहे. या उपकेंद्रातून घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक व शेती अशा ग्राहकांना विविध फीडरद्वारे विद्युत पुरवठा करण्यात येतो. शहरी व ग्रामीण असे दोन विभागअसून, सदरच्या विद्युत केंद्रात वारंवार तांत्रिक बिघाड होतात. त्याचा परिणाम वीजपुरवठ्यावर होतो. वीज नसल्याने ग्रामपालिकेची पाणीपुरवठा व्यवस्था विस्कळीत होते. परिणामी महिलांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. सध्या पाऊस नसल्याने उष्णतामानात कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे डासांचे प्रमाणही वाढले आहे. वीज नसल्याने पंखे, कूलर्स, एसी रात्रभर बंद राहिल्याने नागरिकांच्या झोपेचे खोबरे झाले. वणी शहराची वाढती लोकसंख्या व विजेची मागणी पाहता या उपकेंद्रातील जुनाट यंत्रसामग्री बदलणे गरजेचे आहे. यासाठी लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा महत्त्वाचा आहे. दरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून वेळीअवेळी येणारे तांत्रिक बिघाड दूर करून ग्राहकांना दिलासा देण्याची मागणी होऊ लागली आहे.