शहराला पुन्हा जोरदार पावसाने झोडपले; धुवाधार 'बॅटींग'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 07:39 PM2020-10-21T19:39:48+5:302020-10-21T19:43:54+5:30
ढगांचा गडगडाटासह पावसाच्या मुसळधार सरी सुमारे पाऊणतास कोसळल्याने शहरातील उंचसखल भागात पाण्याचे तळे साचल्याचे चित्र पहावयास मिळाले.
नाशिक : शहर व परिसरात बुधवारी (दि.२१) अचानकपणे ढगांचा गडगडाट अन् वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पावासाला सुरुवात झाली. सुमारे ४५ मिनिटे पावसाच्या दाट सरी जोरदार कोसळल्या. पावासाने केलेल्या धुवाधार बॅटींगमुळे चौकाचौकात पाण्याचे तळे साचले होते. त्यामुळे नागरीकांची धावपळ उडाली
अरबी समुद्रात नव्याने तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यासह उत्तर महाराष्ट्रात परतीच्या पावासाची जोरदार हजेरी सुरु आहे. मंगळवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास शहरासह उपनगरांमध्ये सुमारे वीस मिनिटे जोरदार पाऊस झाला. बुधवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत मागील २४ तासांत २मि.मी पाऊस झाला. मंगळवारी दिवसभर सरींचा वर्षाव झालेला नव्हता. बुधवारी सकाळपासूनच शहरात ढगाळ हवामान कायम होते. अधुनमधुन सुर्यप्रकाशही पडत होता; मात्र वातावरणात कमालीचा उष्मा वाढल्याने दुपारी दीड वाजता शहरात पावसाने वर्दी दिली. शहराच्या मध्यवर्ती भागासह वडाळागाव, इंदिरानगर, गंगापूरोड, महात्मानगर, पंचवटी आदी भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली. अचानकपणे आलेल्या जोरदार पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. पावसाचा वेग इतका जास्त होता की रस्त्यावरचे काहीही दिसत नव्हते. ढगांचा गडगडाटासह पावसाच्या मुसळधार सरी सुमारे पाऊणतास कोसळल्याने शहरातील उंचसखल भागात पाण्याचे तळे साचल्याचे चित्र पहावयास मिळाले. मायकोसर्कल, टिळकवाडी, तरणतलाव सिग्नल, जुना गंगापूरनाका आदी भागात पाणी साचले होते. शहरातील मध्यवर्ती भागातील वीजपुरवठाही खंडीत झाला होता.
संध्याकाळपर्यंत रिपरिप
शहरात बुधवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरु होती. दुपारी पाऊणतास जोरदार सलामी दिल्यानंतरही पावसाची रिपरिप संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत सुरुच होती. यामुळे जनजीवन काहीसे प्रभावीत झाले.
-