शहराला पावसाने झोडपले; ३४ मिमी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 08:59 PM2020-06-29T20:59:46+5:302020-06-29T21:00:27+5:30
यावर्षी जून महिन्यात मागील वर्षाच्या तुलनेत तीपटीने पाऊस अधिक झाला आहे. अद्याप तीनशे मिमीपर्यंत पाऊस शहरात पडला आहे.
नाशिक : शहर व परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. सोमवारी (दि.२९) संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत शहरात ३४ मिमी इतका पाऊस हवामान निरिक्षण केंद्राकडून मोजण्यात आला. शहराच्या मध्यवर्ती परिसरासह विविध उपनगरांमध्येही पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे परिसरातील रस्त्यांवरून पाण्याचे पाट वाहू लागले होते.
शहरात दुपारी दोन वाजेपासून ढगाळ हवामान तयार झाले. शहराच्या सीबीएस, कॉलेजरोड, गंगापूररोड, मेनरोड, शालिमार या भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे विक्रेत्यांची तारांबळ उडाली. तसेच पंचवटी, मेरी, म्हसरूळ या भागातही दुपारच्या सुमारास जोरदार सरींचा वर्षाव झाला. नाशिकरोड, उपनगर, जेलरोड या भागातही दीड तास पावसाने सलामी दिली. त्याचप्रमाणे टाकळीरोड, अशोकामार्ग, द्वारका, जुने नाशिक, गंगापूररोड या परिसरालाही पावसाने झोडपून काढले. पाथर्डी, इंदिरानगर, वडाळागाव या भागात पावसाचा जोर काहीसा कमी राहिला. दुपारी साडेचार वाजेनंतर सातपूर, गंगापूर, अशोकनगर, बारदानफाटा, सोमेश्वर, आनंदवली या भागात पावसाला सुरूवात झाली. तसेच तालुक्यातील दरी, मातोरी, गिरणारे, एकलहरे, पळसे, सामनगाव, देवळाली कॅम्प या शहराजवळच्या खेड्यांमध्येही पावसाच्या दमदार सरी कोसळल्या.
एकूणच शहरात सोमवारी दुपारपासून चौफेर पावसाने हजेरी लावली. काही भागात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाटही झाला. सोमवारी पावसाच्या वातावरणातसुध्दा बहुतांश भागातील वीजपुरवठा टिकून राहिल्यामुळे महावितरणवर नाराज असलेल्या काही नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
यावर्षी जून महिन्यात मागील वर्षाच्या तुलनेत तीपटीने पाऊस अधिक झाला आहे. अद्याप तीनशे मिमीपर्यंत पाऊस शहरात या तीस दिवसांत पडला आहे.