शहराला भगवी झालर - तरुणाईच्या उत्साहाला उधाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:13 AM2021-02-14T04:13:50+5:302021-02-14T04:13:50+5:30
नाशिक : शहरासह जिल्ह्यातील शिवप्रेमींनी शिवजयंतीची तयारी पूर्ण केलेली असताना सरकारने ऐनवळी कोरोना संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता ...
नाशिक : शहरासह जिल्ह्यातील शिवप्रेमींनी शिवजयंतीची तयारी पूर्ण केलेली असताना सरकारने ऐनवळी कोरोना संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता शिवजन्मोत्सव साध्या पद्धतीने करण्याच्या सूचना केल्याने शिवभक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र शिवभक्तांचा उत्साह कणभरही कमी झालेला नाही. त्यामुळे यावर्षीही शिवजयंती सोहळा जल्लोषाताच साजरा करण्याचा निर्धार शिवप्रेमींनी केला आहे.
शहरातील चौकाचौकात भगव्या ध्वजांसह पताका लावण्याचे काम सुरू असून संपूर्ण शहरातील चौकाचौकात शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर भगव्या रंगाची सजावट करण्यात आल्याने शहराला भगवी झालर प्राप्त झाली आहे. शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या या तयारीमुळे शिवप्रेमींच्या उत्साहाला उधान आले असून विविध मंडळांकडून मिरवणुकीसाठी परवानी मिळविण्याचेही प्रयत्न सुरू आहे. तर काही मंडळांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा सोहळा कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून करण्याची तयारी केली आहे. त्यासाठी सुसज्ज मंच उभारण्याचे काम अंतिम टपप्यात आहे. त्याचप्रमाणे दुचाकी रॅलीला परवानगी मिळाली तर शहरातून दुचाकी रॅली काढण्याची तयारीही काही मंडळांनी केली आहे.
कोट-१
शिवजयंती मिरवणूक काढण्यास परवानगी नाही. त्यामुळे शासनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करणार आहे. परवानगी दिल्यास दुचाकी रॅली काढण्यात येईल. यंदा पंचवटी शिवजन्मोत्सव समितीतर्फे पंचवटी कारंजा येथे मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. शिवजयंतीनिमित्त पंचवटी शिवजन्मोत्सव समितीतर्फे रक्तदान तसेच कोरोना योद्धांचा सत्कार केला जाणार आहे.
- मामा राजवाडे, अध्यक्ष, पंचवटी शिवजन्मोत्सव समिती
कोट-२
सातपूरला सर्वपक्षीय शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्ताने यावर्षी 'शिवपुत्र संभाजीराजे' या ऐतिहासिक महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचना व सर्व नियम पाळून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. आम्ही मिरवणूक काढणार नाही. गेल्या पाच वर्षांपासून आम्ही ‘एक गाव एक शिवजन्मोत्सव’ सोहळ्याचे आयोजन करीत आहोत.
- गंगाराम सावळे ,अध्यक्ष, शिवजन्मोत्सव समिती सातपूर
कोट-३
दरवर्षी शिवजयंती मिरवणुकीत सहभाग असतो. मात्र यावर्षी मिरणुकीत सहभागी न होता या हनुमाननगर येथे मास्क वाटप करून शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करणार आहे. यावेळी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन केले जाईल.
- अजय कडभाने, छावा मराठा युवा संघटना
कोट-४
शिवजयंतीला पोलीस प्रशासनाकडून अनेक नियम लागू करण्यात आले आहेत. परंतु अशाही परिस्थितीत पोलिसांनी दिलेल्या नियमांचे पालन करीत तसेच कोरना प्रतिबंधात्मक नियमांचेही पालन करून जल्लोषात शिवजयंती साजरी करणार आहे.
-पवन मटाले, सर्व पक्षीय शिवजयंती समिती, नवीन नाशिक