शहरातील आंदोलने आता ईदगाह मैदानावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 12:51 AM2018-08-01T00:51:36+5:302018-08-01T00:51:53+5:30
महापालिकेच्या स्मार्टसिटी अंतर्गत सुरू असलेल्या त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ रस्त्याच्या कामामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध पक्ष, संघटना, संस्थांना आंदोलनासाठी जागा शिल्लक नसल्याचे कारण दाखवून आंदोलनांना परवानगी नाकारण्याच्या पोलिसांच्या कृतीवर अखेर तोडगा काढण्यात आला
नाशिक : महापालिकेच्या स्मार्टसिटी अंतर्गत सुरू असलेल्या त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ रस्त्याच्या कामामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध पक्ष, संघटना, संस्थांना आंदोलनासाठी जागा शिल्लक नसल्याचे कारण दाखवून आंदोलनांना परवानगी नाकारण्याच्या पोलिसांच्या कृतीवर अखेर तोडगा काढण्यात आला असून, नाशिक महापालिकेने शहरातील आंदोलनांसाठी ईदगाह मैदानावरील जागा देऊ केली आहे. राजकीय पक्ष, संघटना, संस्थांच्या वतीने शासनाच्या विरोधात आंदोलने, मोर्चे, धरणे, उपोषणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर केले जात होते. मुंबई-आग्रा महामार्गावर असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्ता प्रचंड वर्दळीचा असून, दररोज होणाऱ्या आंदोलनांमुळे या रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत होण्याचे तसेच आंदोलकांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर निर्माण होत होता. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारीच जिल्हा न्यायालय व समोरच्या बाजूला शाळा, महाविद्यालये असल्यामुळे नेहमी गजबजलेल्या या रस्त्यावरील आंदोलने हाताळणे पोलिसांसाठी जिकिरीचे होत होते. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनांना परवानगी देऊ नये, असे मनोमन वाटणाºया पोलीस यंत्रणेच्या मदतीला महापालिका धावून आली. नाशिक महापालिकेने स्मार्ट सिटी अंतर्गत त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ रस्त्याचे काम सुरू केले असून, या रस्त्यावरील एका बाजूची वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे. त्यामुळे एका बाजूच्या रस्त्याने दुहेरी वाहतूक केली जात असताना दुसरीकडे विविध राजकीय पक्ष, संघटना व संस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच आंदोलनासाठी जागा व परवानगी मिळण्याचा आग्रह धरला आहे. राज्यात सध्या सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलन सुरू असून, त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यासाठी समितीने विनंती अर्ज केला आहे. परंतु जागा नसल्याचे कारण देत या आंदोलनाला परवानगी दिली जात नाही. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने नाशिक महापालिकेला पत्र देऊन आंदोलनकर्त्यांना पर्यायी जागा देण्याची सूचना केली होती. यासंदर्भात नाशिक महापालिकेने गोल्फ क्लब मैदान (ईदगाह मैदान) येथील मोकळी जागा निश्चित केली आहे. आंदोलनामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, अशा पद्धतीने ईदगाह मैदानावरील जागेवर सीमांकन करण्यात आले असून, यापुढे शहरातील सर्व आंदोलने याच मैदानावर केली जाणार आहेत. त्याशिवाय अन्य ठिकाणच्या आंदोलनाला पोलीस परवानगी देणार नसल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.