शहराचा विकास आराखडा दहा दिवसांत होणार जाहीर
By admin | Published: November 19, 2016 12:16 AM2016-11-19T00:16:15+5:302016-11-19T00:15:37+5:30
मुख्यमंत्री : बांधकाम व्यावसायिकांना आश्वासन
नाशिक : शहराचा नवीन विकास आराखडा येत्या दहा दिवसांत जाहीर करण्यात येणार असून, शहरातील बांधकाम क्षेत्रापुढील विविध प्रलंबित अडथळ्यांबाबतही योग्य मार्ग काढण्यात येणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी के्रडाई तसेच बांधकाम क्षेत्राशी निगडित संस्थांच्या प्रतिनिधींना दिले.
सिन्नर येथे जाहीर सभेप्रसंगी संबंधितांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली. याबाबत क्रेडाईचे अध्यक्ष सुनील कोतवाल यांनी सांगितले, नाशिकचा प्रस्तावित विकास आराखडा लवकरच जाहीर होणार असून, या आराखड्यातील डीसीपीआरबाबत नगररचनेशी संबंधित विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या नाशिककरांच्या काही अपेक्षा आहेत. आगामी पंचवीस वर्षांतील नाशिक शहराचा विकास या आराखड्यानुसार होणार आहे. शहरात विविध तांत्रिक कारणांमुळे गेल्या दीड वर्षांपासून बांधकाम व्यवसाय ठप्प आहे. याबाबतही तोडगा काढण्यासाठी क्रेडाई नाशिक सातत्याने पाठपुरावा करत आहे. त्यासंबंधीची चर्चा मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमवेत करण्यात आली. बांधकाम क्षेत्रापुढे असलेले विविध प्रश्न कसे हाताळावेत याबाबत नव्या विकास आराखड्याच्या डीसीपीआरमध्येच तरतूद झाल्यास झाल्यास कोणतीही संदिग्धता राहणार नाही, असे त्यांना सुचविण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी हा विषय गांभीर्याने घेऊन मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.
यावेळी शिष्टमंडळात इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ आर्किटेक्टचे प्रदीप काळे, आर्किटेक्ट अॅण्ड इंजिनिअर्स असोसिएशनचे सचिन गुळवे, आर्किटेक्ट अविनाश कोठावदे, रसिक बोथरा, उमेश वानखेडे, उदय घुगे आदिंचा समावेश होता. (प्रतिनिधी)