शहरातील अर्थकारणाला बसली खीळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:13 AM2021-04-12T04:13:07+5:302021-04-12T04:13:07+5:30
परप्रांतीयांअभावी कामे खोळंबण्याची शक्यता नाशिक : लॉकडाऊनच्या भीतीमुळे काही परप्रांतीय पुन्हा गावाकडे निघाल्याने कामे खोळंबण्याची शक्यता व्यक्त केली जात ...
परप्रांतीयांअभावी कामे खोळंबण्याची शक्यता
नाशिक : लॉकडाऊनच्या भीतीमुळे काही परप्रांतीय पुन्हा गावाकडे निघाल्याने कामे खोळंबण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेक परप्रांतीय मजूर बांधकाम क्षेत्रात वेगवेगळी कामे करीत असल्याने ही कामे पूर्ण होण्यास विलंब लागण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. घर भाडेतत्त्वावर देणारे घरमालकही यामुळे अडचणीत आले आहेत.
डॉ.आंबेडकर जयंतीचा उत्साह
नाशिक : डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीवर कोरोनाचे सावट असले तरी कार्यकर्त्यांचा उत्साह कमी झालेला नाही. शहरातील विविध भागांत कार्यकर्त्यांनी मोठ- मोठे बॅनर लावून वातावरण निर्मिती केली आहे. अनेक ठिकाणी स्वागतकमानीही उभारण्यात आल्या असून जयंतीची जोरदार तयारी सुरू आहे.
घरातच साजरी करा डॉ. आंबेडकर जयंती
नाशिक : कोरोनाची स्थिती गंभीर असल्याने यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती घरातच साजरी करण्याचे आवाहन विविध सामाजिक संस्था आणि संघटनांतर्फे करण्यात आले आहे. शहरात जमावबंदी आदेश लागू असल्याने एका ठिकाणी गर्दी करता येणार नाही. यामुळे आपापल्या घरातच प्रतिमापूजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना भूर्दंड
नाशिक : रेमडेसिविर इंजेक्शन मिळविण्यासाठी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अनेक नागरिक सकाळपासून शहरातील मेडिकल दुकानांमध्ये चकरा मारत असल्याचे चित्र आहे. यामुळे दुकानांसमोर मोठ्या रांगा लागतात. इंजेक्शन न मिळाल्यास या नागरिकांचा वेळ आणि पैसा वाया जात असून त्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. याबाबत त्वरित तोडगा काढण्याची मागणी होत आहे.
लसीकरणासाठी ज्येष्ठांमध्ये उत्साह
नाशिक : कोरोना लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिकांमध्ये उत्साह कायम असून अनेक नागरिक सकाळीच लसीकरण केंद्रांवर गर्दी करीत आहेत. यामुळे अनेकांना रांगेत ताटकळत उभे रहावे लागते. महापालिकेने लसीकरण केंद्रांची संख्या वाढवावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
भुरट्या चोऱ्या वाढल्याने संताप
नाशिक : शहरात भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. किरकोळ चोऱ्यांची पोलीस ठाण्यात नोंदही केली जात नसल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून भुरट्या चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
पक्ष्यांसाठी दररोज पाण्याची सोय
नाशिक : शहरात उन्हाचा तडाखा वाढला असून अनेक नागरिक पक्ष्यांसाठी चारापाण्याची साेय करत असल्याचे दिसून येत आहे. काही नागरिक नित्यनियमाने पक्ष्यांसाठी ठेवलेल्या भांड्यात पाणी भरतात. त्यांच्यासाठी धान्य टाकतात. विविध सामाजिक संघटनांनीही या कामासाठी पुढाकार घेतला आहे.
खंडित वीजपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त
नाशिक : शहरातील काही भागात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. उन्हामुळे उष्णता वाढली असून पंख्याशिवाय घरात बसणे अनेकांना असह्य होते. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयींना सामोरे जावे लागते. यामुळे वीज वितरण कंपनीच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.
कोथंबीर पीक जगविण्यासाठी कसरत
नाशिक : सध्या कोथंबिरीला चांगला दर मिळत असून कोथंबिरीची लागवड केलेल्या शेतकऱ्यांना पीक जगविण्यासाठी उन्हातान्हात फवारणी करावी लागत आहे. उन्हामुळे कोथंबिर लवकर पिवळी पडते. यासाठी नियमित पाणी देण्याबरोबच औषधींचीही फवारणी करावी लागते. यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादनखर्च वाढला आहे.
कांदा दरातील घसरणीमुळे आर्थिक संकट
नाशिक : जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याच्या दरात माेठी घसरण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. यावर्षी कांदा पिक घेण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक खर्च करावा लागला आहे. बियाणे मिळविण्यापासून ते पीक येईपर्यंत शेतकऱ्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागला. मात्र, पीक हाती येताच भाव पडल्याने अनेकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.