शहराच्या किमान तपमानाचा पारा अडकला १५ अंशांवर...
By admin | Published: November 2, 2014 11:46 PM2014-11-02T23:46:30+5:302014-11-02T23:47:05+5:30
थंडी लांबली : आणखी पंधरा दिवसांनी तपमान घसरण्याचा वेधशाळेचा अंदाज; सध्या पहाटे व रात्री जाणवतोय गारवा
नाशिक : दिवाळीच्या काळात हजेरी लावल्यानंतर कमी झालेल्या थंडीने पुन्हा हजेरी लावली असली, तरी हा पारा १५ वरच स्थिरावल्याने थंडीचा पारा वाढण्यासाठी आणखी १५ दिवस वाट पाहावी लागणार असल्याचे पुणे वेधशाळेच्या सूत्रांनी सांगितले.
दिवाळीच्या दरम्यान कमी पावसामुळे कमी झालेले तपमान २५ तारखेपासून पुन्हा वाढायला सुरुवात झाली होती; परंतु २७ तारखेपासून हा पारा पुन्हा २० च्या आत येऊ लागला. २७ तारखेला १९ वर असलेला पारा त्यानंतर हळूहळू खाली येऊ लागल्याने आता थंडीचे दिवस आले असे समजून उबदार कपडे वर येऊ लागले. सायंकाळनंतर काही ठिकाणी शेकोट्याही पेटू लागल्या; परंतु हा पारा १४ आणि १५ वरच थांबल्याने थंडीनेही विश्रांती घेतली. त्यामुळे दिवसा गरम आणि रात्री थंडी असे वातावरण निर्माण झाले.
पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार सध्या तरी तपमानाचा पारा १५ वरच स्थिर राहणार असल्याने येत्या काही दिवसांत तरी थंडीचे प्रमाण वाढणार नसल्याचे स्पष्ट होते आहे. त्यामुळे किमान पंधरा दिवस तरी पारा १५ च्या खाली येण्याची शक्यता नसून त्यानंतर पारा कमी होण्याची दाट शक्यता आहे. (प्रतिनिधी)