धास्तीने शहरातील बाजारपेठ पडली ओस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 11:41 PM2020-03-14T23:41:24+5:302020-03-15T00:14:33+5:30
राज्यात होत असलेला कोरोनाचा फैलाव आणि कोरोनापासून बचावासाठी दक्षतेचे उपाय म्हणून मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे आणि नवी मुंबई यांसारख्या महानगरांमध्ये शनिवारपासून सिनेमागृहे, नाट्यगृहे, व्यायामशाळा, तरण तलाव आदी ठिकाणे बंद ठेवण्याचे आदेश शासनाने दिल्यानंतर त्यांचे पडसाद नाशिकमध्येही उमटू लागले आहेत. गर्दी टाळण्यासाठी नाशिककरांकडून बाजारपेठेतील गर्दीची ठिकाणे, मॉल्स, हॉटेल्स अशा ठिकाणी जाणे टाळण्यास सुरुवात केल्याने बाजारपेठेत शुकशुकाट दिसून येत आहे.
नाशिक : राज्यात होत असलेला कोरोनाचा फैलाव आणि कोरोनापासून बचावासाठी दक्षतेचे उपाय म्हणून मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे आणि नवी मुंबई यांसारख्या महानगरांमध्ये शनिवारपासून सिनेमागृहे, नाट्यगृहे, व्यायामशाळा, तरण तलाव आदी ठिकाणे बंद ठेवण्याचे आदेश शासनाने दिल्यानंतर त्यांचे पडसाद नाशिकमध्येही उमटू लागले आहेत. गर्दी टाळण्यासाठी नाशिककरांकडून बाजारपेठेतील गर्दीची ठिकाणे, मॉल्स, हॉटेल्स अशा ठिकाणी जाणे टाळण्यास सुरुवात केल्याने बाजारपेठेत शुकशुकाट दिसून येत आहे.
कोरोनाच्या भीतीमुळे नाशिक शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या मेनरोडसह कॉलेजरोज, गंगापूररोड, उंटवाडी, नाशिकरोड, तपोवनरोड परिसरातील मोठ-मोठी दुकाने व मॉल्स ओस पडल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे.
गर्दी टाळण्यासाठी अत्यावश्यक गरजेच्या गोष्टी वगळता अन्य वस्तूंची खरेदी पुढे ढकलण्याचा अथवा आॅनलाइन खरेदीचा पर्याय नागरिकांकडून स्वीकारला जाताना दिसत आहे. त्याचप्रमाणे सण-उत्सवाच्या काळात सुट्टीमुळे वाढणारे हॉटेलिंगही कोरोनामुळे प्रभावित झाल्याचे दिसून येत आहे.
सॅनिटायझर, मास्कचा तुटवडा
नाशिक शहरात अजून एकही संशयित रुग्णाचा कोरोना तपासणीचा अहवाल पॉझिटीव्ह आलेला नाही. परंतु राज्यात या आजाराचा प्रसार होऊ लागल्याने नाशिकमध्येही नागरिकांकडून सॅनिटायझर आणि मास्कची मागणी वाढली आहे. त्यामुळे शहरात गेल्या काही दिवसांपासून सॅनिटायझर, मास्कचा तुटवडा जाणवत असून, हात स्वच्छ करण्याचे अन्य द्रव पदार्थही अपुरे पडत असल्याचे दिसून येत आहे.