शहराचा पॉझिटीव्हीटी रेट अवघा ६ टक्क्यांवर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:13 AM2021-05-17T04:13:36+5:302021-05-17T04:13:36+5:30
नाशिक : कोरोनाच्या बाधित संख्येपेक्षा कोरोनामुक्तांचा दर वाढत असतानाच जिल्ह्यातील चाचण्यांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आली आहे. त्यामुळे एकूण ...
नाशिक : कोरोनाच्या बाधित संख्येपेक्षा कोरोनामुक्तांचा दर वाढत असतानाच जिल्ह्यातील चाचण्यांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आली आहे. त्यामुळे एकूण चाचणीच्या तुलनेत बाधित संख्येचा दर घसरल्याने नाशिक शहरातील कोरोना बाधितांचा पॉझिटिव्हिटी रेट ६ टक्क्यांवर आला असून जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पॉझिटिव्हिटी रेट ११ टक्के आहे.
नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने घट येत आहे. मात्र, दक्षतेच्या पार्श्वभूमीवर शहरासह जिल्ह्यात कोरोनाच्या चाचण्यांचे प्रमाणदेखील वाढविण्यात आले आहे. सध्या जिल्ह्यात किमान बारा ते पंधरा हजार नागरिकांच्या चाचण्या केल्या जात आहेत. त्या तुलनेत रुग्ण बाधित आढळून येण्याच्या प्रमाणात घट झाल्यामुळे शहरातील पॉझिटीव्हीटी रेटमध्ये अवघ्या ६ टक्क्यांपर्यंत घट आली आहे. काही दिवसांपूर्वी नाशिकचा पॉझिटीव्हीटी रेट हा ३० टक्क्यांहून अधिक होता. त्या तुलनेत पाॅझिटीव्हीटी रेटमधील घट खूप दिलासादायक आहे. केंद्रानेदेखील बाधित किती निघतील त्याचा विचार न करता अधिकाधिक चाचण्या वाढवण्यावर भर देण्याचे निर्देश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर बाधित दर संख्येत आलेली घट मे महिन्याच्या अखेरपर्यंत शहर आणि जिल्ह्यातील कोरोनाचे प्रमाण कमी होण्याची संकेत देत आहे.
इन्फो
दोन्ही बाबी कारणीभूत
शहरात गत आठवड्यापासून निर्बंध कडक करण्यात आल्याने कोरोना बाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाणच कमी होऊ लागले आहे. कठोर निर्बंधांचा हा सकारात्मक परिणाम दिसून येत असतानाच प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या वतीने चाचण्यांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. चाचण्यांची संख्या वाढवूनदेखील बाधित रुग्ण कमी आढळल्यानेच पॉझिटिव्हीटी रेटमध्ये घट आली आहे.
इन्फो
ग्रामीण भागात अजून वाढवणार चाचण्या
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातच सध्या कोरोनाचे अधिक रुग्ण आणि अधिक मृत्यू घडून येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील चाचण्या वाढविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातही अधिकाधिक चाचण्या केल्यास लवकरात लवकर कोरोनाबाधित शोधून काढणे शक्य होणार आहे. तसेच चाचण्या वाढवूनही त्या प्रमाणात रुग्ण आढळून न आल्यासही ग्रामीणचा पॉझिटिव्हीटी रेट कमी होऊ शकणार आहे.