शहरातील शिवालयांमध्ये ‘बम बम भोले’चा गजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 01:33 AM2018-08-21T01:33:02+5:302018-08-21T01:33:31+5:30
श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी (दि.२०) शहरातील शिवालयांमध्ये भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. ‘ओम नम: शिवाय’, ‘बम बम भोले’चा गजर करीत भाविकांनी मंदिरांमध्ये अभिषेक, लघुरुद्र, महारुद्र, आरती आदींना प्राधान्य दिले.
नाशिक : श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी (दि.२०) शहरातील शिवालयांमध्ये भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. ‘ओम नम: शिवाय’, ‘बम बम भोले’चा गजर करीत भाविकांनी मंदिरांमध्ये अभिषेक, लघुरुद्र, महारुद्र, आरती आदींना प्राधान्य दिले. महिलांनी शिवमूठवर भर दिला. या सोमवारी तिळाची शिवमूठ असल्याने महिलांनी शिवमंदिरांमध्ये तीळ वाहिले. सोमेश्वर, कपालेश्वर या मंदिरांबरोबरच उपनगरांमधील महादेवाच्या मंदिरांमध्ये भाविकांनी सकाळपासून दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. भाविकांची गर्दी लक्षात घेता सर्व देवस्थानांनी सोयीसुविधा केल्या होत्या. मंदिरांबाहेर फुले, फळे, प्रसाद आदींची दुकाने गर्दीने फुलून गेली होती. अनेक भाविकांनी भल्या पहाटे त्र्यंबकेश्वरी जाऊन कुशावर्तात स्नान, त्र्यंबकराजाचे दर्शन आणि नंतर निसर्गाच्या सान्निध्यात काही क्षण घालवत आनंद घेण्यावर भर दिला. शहरात चांगला पाऊस सुरू असल्याने गंगेला भरपूर पाणी असून भाविकांनी गोदास्नानाचाही आनंद घेतला. अनेकांचा उपवास असल्याने राजगिरा लाडू, वड्या, फळे, फराळाचे पदार्थ, खजूर आदींना मागणी वाढली होती. काहींनी एकवेळच फराळ करून रात्रीचे जेवण टाळत उपवास केला. काहींनी निर्जळी उपवासही केला. भाविकांनी शिवमंदिरांमध्ये शिवलीलामृत, शिवमहापुराण आदींचे पठण करीत भजन, अभिषेक, रुद्राभिषेक करण्यास प्राधान्य दिले. श्रावणी सोमवारी महादेवाला बेल वाहण्याची प्रथा असल्याने बाजारात बेलाला खूप मागणी आली होती. जिल्ह्यातील दरी, मातोरी, मखमलाबाद ठिकाणांहून रविवारी रात्रीपासून शहरात मोठ्या प्रमाणात बेल दाखल झाला होता.
त्र्यंबकेश्वरसाठी सोडल्या जादा बसेस श्रावणी सोमवारनिमित्त नाशिकहून त्र्यंबकेश्वरसाठी मोठ्या प्रमाणात बस सोडण्यात आल्या होत्या. भाविकांनी त्र्यंबकेश्वरी दर्शन, ब्रह्मगिरीला फेरी, ब्रह्मगिरी, गंगाद्वारला दर्शन करीत एकीकडे निसर्गसान्निध्याची मजा लुटत श्रावणी सोमवारचे पुण्य मिळवण्याचाही प्रयत्न केला.