नागरिक हवालदिल : पंधरा दिवसांनी पाणीपुरवठा
By Admin | Published: June 18, 2015 12:27 AM2015-06-18T00:27:13+5:302015-06-18T00:27:13+5:30
नांदगावी भीषण पाणीटंचाई
नांदगाव : पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याचा अनुभव नांदगावकर गेल्या दोन वर्षांपासून घेत आहेत. आजही तो अनुभव येत आहे. यात वेगळे काही नसले तरी अलीकडे आवर्तनाचा कालावधी आवर्तनागणिक वाढू लागला आहे. ही नागरिकांच्या दृष्टीने चिंतेची बाब झाली असून, प्रशासन व लोकप्रतिनिधींकडे पाण्याची समस्या सोडवून नागरिकांना दिलासा देण्यासाठी आवश्यक इच्छाशक्ती नसल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत.
प्रशासन, नगरसेवक, जिल्हा परिषद पाणी विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, वीज वितरण कंपनी यांच्या मे महिन्यात दोन बैठका झाल्या. आवर्तनाचा कालावधी कमी होऊन शहरवासीयांना आठ दिवसांत पाणी मिळणार या वृत्ताने नागरिकांच्या मनात मोर नाचू लागले. पण त्यानंतर परिस्थिती अधिकच ढासळली. १० ते १२ दिवसांनी येणारे पाणी यावेळी चक्क पंधरा दिवसांनी आले.
सकाळपासून दुपारपर्यंत एकच चर्चा.. नळ आले, नळ गेले... यातच टाइमपास झाला. जल आगमनापूर्वी येणाऱ्या हवेचा अंदाज नळाच्या तोटीला हात लावून पाहण्यातच नळधारकांचे कित्येक तास वाया गेले. एवढे करूनही पाणी आले तर त्याला दाब नसल्याने कितीतरी भागांमध्ये पाणी लवकर पोहोचले नाही. त्यामुळे पंधरा दिवसांनंतर पाणी येऊनही महिलांची अवस्था घट डोईवर.. घट कमरेवर... अशी झाली.
मे महिन्यातल्या बैठकांचे सूप वाजले. नगरसेवक, प्रशासन यांचे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांकडे बोट, तर त्यांचा वीज वितरण कंपनीकडे अंगुलीनिर्देश. एकमेकांचे वाभाडे काढण्यात सर्व ‘पार्ट्यां’चे दोन तास गेले. बैठकीत अधिकारवाणीने सांगू शकणारा कोणीच नसल्याने काहीच निष्पन्न झाले नाही. त्याची प्रचिती जूनमध्ये आली. पंधरा दिवस पाणीपुरवठाच झाला नाही. झाला तो अपुराच झाला. बैठकीत समोर आलेली धक्कादायक बाब अशी की, दोन वर्षांपूर्वी तातडीची पूरक योजना म्हणून गाजावाजा करून उद्घाटन केलेली माणिकपुंज धरणाची पाणीपुरवठा योजना त्यातील अंगभूत त्रुटींमुळे नगरपालिकेने मे २०१५ पर्यंत ताब्यात घेतलेली नव्हती.
या सर्व गोंधळात शहरवासीयांच्या भावना दर्शविणारे चित्र येथील शनी चौकात
काढले आहे. ते बघून थबकणारे नागरिक नगरपरिषदेला दूषणे देत आहेत. (वार्ताहर)