नागरी प्रश्नी राष्ट्रवादीचे निदर्शन आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:14 AM2021-01-22T04:14:30+5:302021-01-22T04:14:30+5:30
नाशिक रोड : नाशिक रोड परिसरातील नागरी समस्या सोडवून विविध सुविधा नागरिकांना त्वरित उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीसाठी ...
नाशिक रोड : नाशिक रोड परिसरातील नागरी समस्या सोडवून विविध सुविधा नागरिकांना त्वरित उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीसाठी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने नाशिक रोड मनपा विभागीय कार्यालयासमोर घोषणा देत निदर्शन आंदोलन करण्यात आले.
नाशिक रोड परिसरातील विविध समस्या मार्गी लावण्यासाठी गुरुवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, निवृत्ती अरिंगळे, नाशिक रोड राष्ट्रवादी अध्यक्ष मनोहर कोरडे, नगरसेवक जगदीश पवार यांच्या नेतृत्वाखाली मनपा प्रशासन व भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी मनपा विभागीय अधिकारी दिलीप मेनकर यांना देण्यात आलेल्या निवेदनात जेल रोड प्रभाग १७ व १८ मध्ये विकासकामांसाठी खोदलेला रस्ता बुजवावा, पाणीपुरवठा सुरळीत करावा, वायरिंग भूमिगत करावी, भूमिगत गटारी योजना पूर्ण करावी, पंचक शनी मंदिराजवळील भाजी बाजार सुरु करावा, प्रभाग १९ मध्ये सार्वजनिक स्वच्छतागृह, शौचालय व क्रीडांगण बांधावे, जलवाहिनी टाकावी, प्रभाग २० मध्ये खोदलेल्या रस्त्याचे डांबरीकरण करावे, मंगल कार्यालयासमोरील रस्त्यावर होणारे पार्किंग बंद करावे, जुन्या बिटको रुग्णालयात नाक, कान, घसा याचे डॉक्टर उपलब्ध करावेत, रुग्णालयाबाहेर सार्वजनिक स्वच्छतागृह व शौचालय बांधावे, प्रभाग २१ मध्ये पिंपळगाव रस्त्याचे डांबरीकरण करावे, महापालिकेचे विविध भरणा केंद्र सुरु करावे, देवळाली गाव मैदानात आठवडा बाजार भरवावा, आदी मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
या आंदोलनामध्ये माजी नगरसेवक शैलेश ढगे, हरिष भडांगे, शिवा भागवत, अशोक मोगल पाटील, भाईजान बाटलीवाला, बाळासाहेब मते, योगेश निसाळ, संजय पगारे, विक्रम कोठुळे, प्रशांत वाघ, चंदू साडे, संजय खैरनार, सुनीता निमसे, वंदना चाळीसगावकर, वैशाली दाणी, शोभा आवारे, युवराज मुठाळ, मनिष हांडोरे, वसिम शेख, मिलिंद पगारे, गिरीष मुदलीयार आदी सहभागी झाले होते. (फोटो २१ एनसीपी)