भूमिगत गटारी, तुंबलेल्या शौचालयाने नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 12:31 AM2019-05-16T00:31:29+5:302019-05-16T00:31:48+5:30
सुमारे दहा हजार लोकसंख्या असलेल्या सातपूर विभागातील प्रबुद्धनगरात अनेक समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. गल्लीबोळातील रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे.
सातपूर : सुमारे दहा हजार लोकसंख्या असलेल्या सातपूर विभागातील प्रबुद्धनगरात अनेक समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. गल्लीबोळातील रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सांडपाण्यासाठी टाकलेल्या भूमिगत गटारी पूर्णपणे तुंबल्या असून, ढाप्यांमधून दुर्गंधीयुक्त सांडपाणी सर्रास रस्त्यावरून दिवसभर वाहत असते. या दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, साथीचे आजार पसरण्याची भीती असून, तुंबलेल्या शौचालयांमुळे महिलांची कुचंबणा होत आहे.
सातपूर औद्योगिक वसाहतीतील महिंद्र अॅन्ड महिंद्र कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर गेल्या ३५ ते ४० वर्षांपासून प्रबुद्धनगर (झोपडपट्टी) वसाहत असून, जवळपास १० हजाराच्या आसपास लोकसंख्या आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून रोजगारासाठी आलेले लोक या ठिकाणी स्थायिक झालेले आहेत. हळूहळू वसाहत वाढत गेली. त्या प्रमाणात लोकप्रतिनिधींनी महापालिकेच्या माध्यमातून सुविधा पुरविण्याचा प्रयत्न केला, परंतु या सुविधा पुरविताना भविष्याचा विचार करण्यात आलेला नाही. याच सुविधा आता अडचणीच्या ठरत आहेत.
रस्ते काँक्रीटचे केले, नंतर ते फोडण्यात आलेत. अशा अनेक अडचणी निर्माण झाल्या असून, नागरिक त्रस्त होत आहेत.
प्रबुद्धनगरात सर्वात मोठी समस्या भूमिगत सांडपाणी गटारींची आहे. संत रोहिदास चौकात भूमिगत गटारी कायम तुंबत असून, मनपाकडे वारंवार तक्रारी करूनही लक्ष देत नसल्याचे शोभा कुरणे, कमलाबाई ढाले यांनी सांगितले. कधीतरी चेंबर साफ करायला कर्मचारी आले तर घाण तशीच ठेवतात. ती घाण आम्हाला उचलावी लागत असल्याचे रंजना राजवंशी यांनी सांगितले. घरोघरी शौचालय उभारण्याची योजना अर्धवट राबविल्याचे राधेकिसन ढोके, दत्तात्रय पवार यांनी सांगितले. दादासाहेब गायकवाड चौकातदेखील सांडपाणी दिवसभर रस्त्यावर वाहत असल्याचे हिराबाई लोखंडे, पद्मा गायकवाड यांनी सांगितले. महापालिकेकडे तक्रार करूनदेखील कोणीही कर्मचारी येत नसल्याचे रमेश जाधव, राजेंद्र पगारे यांनी सांगितले. दुर्गंधीयुक्त सांडपाणी वाहत असल्याने त्यातील किडे घरात येतात असे ताईबाई लोखंडे, मसाजी शिंदे यांचे म्हणणे आहे. आम्रपाली चौकातदेखील अशीच स्थिती आहे. शौचालयाचे भांडे तुटलेले आहे. दरवाजे मोडकळीस आलेले आहेत. साफसफाई होत नसल्याचे रुक्मिणी वाव्हळे यांनी सांगितले. पैसे देऊन शौचालयाची साफसफाई करावी लागत असल्याचे अनुसया रोकडे, रब्बानी शेख, तायरा शेख यांनी सांगितले. गौतम चौकात तुंबलेल्या गटारी आम्हालाच साफ करावी लागते, असे प्रियांका देवकर, शांताराम विटकर यांनी सांगितले. बुद्धविहार परिसर पथदीप नसल्याने अंधाराचे साम्राज्य पसरत असल्याचे राजू गोतीस यांनी सांगितले.
(उद्याच्या अंकात ,एकलव्य वसाहत, भगूर)