जिल्हा रुग्णालयात पुढील आठवड्यात १६ इन्क्युबेटर...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 10:52 PM2017-09-16T22:52:17+5:302017-09-16T22:56:43+5:30
नाशिक : जिल्हा रुग्णालयातील अर्भक मृत्यू प्रकरणामुळे एसएनसीयू विभागातील इन्क्युबेटरचा बिकट प्रश्न समोर आला़ या प्रकरणावरून धडा घेत शासन जिल्हा रुग्णालयास आणखी १६ इन्क्युबेटर देणार असून, ते पुढील आठवड्यात मिळणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ सुरेश जगदाळे यांनी दिली़ विशेष म्हणजे या इन्क्युबेटरबरोबरच तीन नवीन सी-पॅप मशीनही मिळणार आहेत़
जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयू (स्पेशल न्यूबॉर्न केअर युनिट) कक्षात पाच महिन्यात तब्बल १८७ बालकांचा मृत्यू झाला़ माध्यमांनी हा प्रकार समोर आणल्यानंतर शासनाचा आरोग्य विभाग जागा झाला़ यानंतर आरोग्यमंत्र्यांनी जिल्हा रुग्णालयास भेट देऊन वस्तुस्थिती जाणून घेतली़ त्यामध्ये सद्यस्थितीतील १८ इन्क्युबेटर हे प्रतिदिन दाखल होणाºया अर्भकांच्या तुलनेत तोकडी असल्याचे वास्तव समोर आले़
जिल्हा रुग्णालयातील या समस्येवर आरोग्यमंत्र्यांनी निर्णय घेत आणखी १६ इन्क्युबेटर व तीन सी-पॅप मशीन देण्याबाबत प्रक्रिया पूर्ण केली आहे़ यामुळे जिल्हा रुग्णालयात ३५ इन्क्युबेटर होणार आहेत़ यामुळे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाºया नवजात अर्भकांना सुविधा प्राप्त होणार असून, रुग्णालयावरील ताणही कमी होणार आहे़ याबरोबरच महापालिकेच्या बिटको, कथडा, इंदिरा गांधी व मोरवाडी येथील रुग्णालयांमध्ये १६ इन्क्युबेटर कार्यान्वित असल्याची माहिती जगदाळे यांनी दिली़