बिबट्याच्या हल्ल्यात नागरिक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 00:37 IST2021-06-15T22:29:59+5:302021-06-16T00:37:50+5:30
ननाशी : दिंडोरी तालुक्यातील देवळीचा पाडा येथील नागरिकावर वनारे शिवारात बिबट्याने हल्ला केला असून या हल्ल्यात सदर नागरिक जखमी झाला असून भर दुपारी बिबट्याचा हल्ला झाल्याने परिसरात घबराट निर्माण झाली आहे.

बिबट्याच्या हल्ल्यात नागरिक जखमी
ननाशी : दिंडोरी तालुक्यातील देवळीचा पाडा येथील नागरिकावर वनारे शिवारात बिबट्याने हल्ला केला असून या हल्ल्यात सदर नागरिक जखमी झाला असून भर दुपारी बिबट्याचा हल्ला झाल्याने परिसरात घबराट निर्माण झाली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, देवळीचा पाडा येथील दत्तू गंगाराम शेवरे (६०) हे शेताला कुंपण करण्यासाठी वनारे शिवारातील जंगलात काटेरी वनस्पती आणण्यासाठी एका सहकाऱ्यासोबत दुपारी तीनच्या सुमारास गेले होते. काटेरी वनस्पती तोडत असतांना एका दाट झाडीतून अचानक बिबट्याने दत्तू शेवरे यांच्यावर हल्ला चढविला आणि पंजाने त्यांच्यावर हल्ला केला त्यात शेवरे यांच्या डोक्याच्या मागील बाजूस आणि उजव्या हातावर गंभीर दुखापत झाली आहे.
अचानक झालेल्या हल्ल्याने शेवरे प्रचंड घाबरून गेले पण त्यांच्या सोबत असलेल्या सहकाऱ्याने आरडाओरड करीत आजूबाजूचे नागरिक गोळा केले आणि बिबट्याला पळवून लावले. दरम्यान जखमी झालेल्या दत्तू शेवरे यांना तातडीने ननाशी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तसेच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. दरम्यान सध्या पावसाचे दिवस असल्याने परिसरात शेतांचे मोकाट गुरांपासून संरक्षण करण्यासाठी काटेरी वनस्पतींचे कुंपण केले जाते. त्यासाठी काटेरी वनस्पती आणण्यासाठी शेतकरी आणि नागरिक जंगल परिसरात जात असतात. ऐन दुपारी बिबट्याने हल्ला केल्याने परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण असून वनविभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करीत आहेत.