सिव्हिलच्या नवजात बालक कक्षातील अग्निशमन यंत्रणा ‘आउटडेटेड’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:12 AM2021-01-10T04:12:13+5:302021-01-10T04:12:13+5:30

नाशिक : नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील नवजात बालक कक्षामध्ये असलेली अग्निशमन यंत्रणेची (फायर एक्स्टिंग्विशर) मुदत गतवर्षी ३० एप्रिल २०२० या ...

Civil's neonatal firefighting system 'outdated'! | सिव्हिलच्या नवजात बालक कक्षातील अग्निशमन यंत्रणा ‘आउटडेटेड’!

सिव्हिलच्या नवजात बालक कक्षातील अग्निशमन यंत्रणा ‘आउटडेटेड’!

Next

नाशिक : नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील नवजात बालक कक्षामध्ये असलेली अग्निशमन यंत्रणेची (फायर एक्स्टिंग्विशर) मुदत गतवर्षी ३० एप्रिल २०२० या तारखेलाच संपुष्टात आलेली आहे. तर प्रसूती कक्षातील फायर एक्स्टिंग्विशरची मुदतदेखील त्याच दिवशी संपुष्टात आलेली असताना हे आउटडेटेड सिलिंडर त्या कक्षांमध्ये केवळ दिखाव्यासाठी असल्याचे दिसून येत आहे. भंडाऱ्याच्या रुग्णालयात घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या ‘लोकमत’च्या पाहणीत हे धक्कादायक वास्तव उघडकीस आले आहे.

भंडाऱ्यामध्ये शुक्रवारी मध्यरात्री जिल्हा रुग्णालयात झालेल्या दुर्घटनेत १० बालकांना जीव गमवावा लागला होता. कोणत्याही कारणामुळे लागलेली आग वेळीच लक्षात आली असती आणि तेथील कर्मचाऱ्यांनी फायर एक्स्टिंग्विशरचा वापर करून ती आग रोखली असती, तरी त्या १० निष्पाप चिमुकल्यांचा जीव वाचला असता. घरी बाळ जन्मल्याच्या आनंदात असलेल्या पालकांवर टाहो फोडण्याची वेळ आली नसती. त्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने शनिवारी दुपारी जिल्हा रुग्णालयातील नवजात बालक कक्ष आणि प्रसूती कक्षातील ‘फायर एक्स्टिंग्विशर’ची पाहणी केल्यानंतर धक्कादायक वास्तव उघडकीस आले. या दोन्ही कक्षांमध्ये असलेल्या ५ किलो क्षमतेच्या फायर एक्स्टिंग्विशरच्या सिलिंडरची मुदत संपुष्टात येऊन ८ महिन्यांहून अधिक कालावधी उलटलेला असल्याचे दिसून आले. मुळात जिल्हा रुग्णालयासारख्या प्रचंड वर्दळ असलेल्या रुग्णालयात आणि त्यातही अत्यंत संवेदनशील अशा नवजात बालक कक्षातील यंत्रणेची मुदत संपुष्टात येईपर्यंत आणि त्यानंतरही ८ महिने सिव्हिलचे कर्मचारी आणि प्रशासकीय यंत्रणा निष्क्रिय कसे राहू शकतात? की इतक्या अत्यंत संवेदनशील विभागाकडे काळजीने पाहणारी किंवा मुदतीसारख्या बाबींवर देखरेख ठेवणारी यंत्रणाच अस्तित्वात नाही, असा सवाल यानिमित्ताने निर्माण झाला आहे.

सेन्सर यंत्रणा ठरू शकते उपकारक

मोठमोठ्या हॉस्पिटल्समध्ये संवेदनशील कक्षांमध्ये चोवीस तास कर्मचारी दक्ष असतात. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून काही हॉस्पिटल्समध्ये सेंसर यंत्रणादेखील बसवलेली असते. त्यामुळे संबंधित कक्षात थोडा जरी धूर येऊ लागला तरी सायरन वाजू लागतो. अशी यंत्रणा असल्याने अशा दुर्दैवी घटना घडण्यापूर्वीच रोखल्या जातात. कोट्यवधींच्या मशिनरी आणणाऱ्या यंत्रणेला सेन्सरसारख्या यंत्रणांचा अवलंब करणे शक्य असले तरी जिथे गोरगरिबांची मुलेच जन्मतात त्यांच्याबाबत इतका गांभीर्याने विचार करण्याची कुणालाच गरज वाटत नाही, हेच मोठे दुर्दैव आहे.

फोटो - १०५, १०७ , ११४

जिल्हा रुग्णालयातील नवजात बालक कक्ष आणि प्रसूती कक्षात बसविण्यात आलेले आउटडेटेड फायर एक्स्टिंग्विशर.

Web Title: Civil's neonatal firefighting system 'outdated'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.