आदिवासी तालुक्यांभोवती ‘सिकलसेल’चा फास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 01:26 AM2018-06-19T01:26:02+5:302018-06-19T01:26:02+5:30
वयाची पाच वर्षे पूर्ण होण्याअगोदर मूल दगावण्याचे प्रमाण जिल्ह्यातील आदिवासी भागातील तालुक्यांमध्ये आजही गंभीर आहे. आदिवासी तालुक्यांभोवती ‘सिकलसेल’ या अनुवांशिक आजाराचा फास दिवसेंदिवस अधिक घट्ट होत आहे. वाहक चाचणीची व्याप्ती वाढविण्याची गरज आहे.
नाशिक : वयाची पाच वर्षे पूर्ण होण्याअगोदर मूल दगावण्याचे प्रमाण जिल्ह्यातील आदिवासी भागातील तालुक्यांमध्ये आजही गंभीर आहे. आदिवासी तालुक्यांभोवती ‘सिकलसेल’ या अनुवांशिक आजाराचा फास दिवसेंदिवस अधिक घट्ट होत आहे. वाहक चाचणीची व्याप्ती वाढविण्याची गरज आहे. नाशिक जिल्ह्यात दरमहा दोन ते तीन रुग्ण आढळत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. आदिवासी तालुक्यांमध्ये या आजाराचे वाहकांचे प्रमाण जवळपास १५ टक्क्यांपर्यंत पोहचले आहे. सिकलसेल ही एक रक्तव्याधी असून, तिचे संक्रमण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे होते. या अनुवंशिक आजारावर औषधोपचार उपलब्ध आहे; मात्र अचूक व लवकर निदान होत नसल्यामुळे रुग्ण दगावतात. अचूक निदान न होण्यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे या व्याधीने ग्रस्त असलेल्या रुग्णामध्ये ठराविक लक्षणे दिसत नाही. राज्यातील ठाणे, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव या जिल्ह्णांमधील आदिवासी तालुक्यांमध्ये सिकलसेलचे प्रमाण आढळून येते. आदिवासी भागात या आजाराची पाळेमुळे रुजलेली आहे. शासनस्तरावर या आजारावर मात करण्यासाठी २००९ सालापासून विविध उपाययोजना राबविल्या जात असल्या तरी वाहक चाचणीची व्याप्ती सरकारकडून वाढविली गेली पाहिजे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पेठ, सुरगाणा, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी यांसारख्या आदिवासी तालुक्यांमध्ये सिकलसेल आजाराबाबत जनजागृती आणि व्यापक वाहक चाचणीची आवश्यकता आहे. या आजाराविषयी नागरिकांमध्ये माहिती नसल्याने अनेकदा उपचारास विलंब होतो. आजाराची फारशी लक्षणे दिसत नाही. आदिवासी भागातील निरक्षरतेमुळे सिकलसेलचा फास आदिवासी लोकसंख्येभोवती अधिकाधिक घट्ट होऊ लागला आहे.
..तर आई-वडिलांपासून संक्रमण
रक्तामधील हिमोग्लोबीन हे मुलाला आई-वडिलांकडून प्राप्त होते. एकाच प्रकारचे हिमोग्लोबीन आई-वडिलांकडून जनुकांद्वारे मुलाला मिळाल्यास अथवा दोघांपैकी एक सिकलसेल वाहक असल्यास मुलाला या अनुवंशिक रक्तव्याधीची लागण होऊ शकते. ज्या भागात हिवताप मोठ्या प्रमाणात आढळून येतो त्या भागातील रहिवाशांमध्ये सिकलसेलचा आजार वंशजात आढळतो.
तांबड्या पेशींचा मृत्यू
सिकलसेल आजार खरे तर अनेक व्याधींचा समुच्चय आहे. ही व्याधी असलेल्या रुग्णांना काही त्रास होत नाही; मात्र त्यांच्या रक्तामधील तांबड्या पेशी लवकर मृत होतात. परिणामी या पेशी रक्तवाहिन्यांमधून सहज प्रवाहित होत नाही व रक्तप्रवाहाला अडथळा निर्माण होऊन शरीराच्या एखाद्या भागात तीव्र, मध्यम किंवा अतितीव्र स्वरूपाच्या वेदना जाणवू शकतात. या वेदनांचा अनुभव प्रत्येकाचा भिन्न असू शकतो.