आयुक्तांनी घेतला मनपा शिक्षकांचा वर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 01:10 AM2018-07-14T01:10:02+5:302018-07-14T01:10:47+5:30
नाशिक : महापालिका शाळेमधील शिक्षक अध्ययनच विसरले असल्याने शाळा आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाला आहे. चांगले विद्यार्थी घडविण्यापेक्षा चांगला माणूस घडविण्यासाठी शिक्षकाने शिक्षक म्हणूनच आपली छाप सोडणे अपेक्षित आहे. मात्र शिकविण्याची साचेबद्ध पद्धतीमुळे सर्वांगीण शिक्षण हरवून बसल्याचे प्रतिपादन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले.
महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांनी दुपारच्या सत्रात कालिदास कलामंदिरात महापालिका शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांना गुणवत्ता आणि कौशल्यपूर्ण शिक्षणाचे धडे दिले. शिक्षणाच्या बाजारीकरणाला प्राथमिक शिक्षणातील उदासीनता आणि शिक्षकांची मानसिकता कारणीभूत असून, ही व्यवस्था बदलण्याची गरज आहे. शिक्षक म्हणजे काय आणि आपली भूमिका कशी असली पाहिजे हे अगोदर शिकण्याची गरज आहे. शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवसापासून गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे नियोजन करून विद्यार्थ्यांना शिकविले पाहिजे. परंपरागत चालत आलेल्या पद्धतीप्रमाणे न जाता नावीन्यपूर्ण अध्ययन आणि अध्यापन कौशल्याचा वापर शिक्षकांनी केला तरच महापालिका शाळांमध्ये विद्यार्र्थी टिकतील. यासाठी शिक्षक, विद्यार्थी, पालक, संस्थाचालक यांच्यात समन्वय निर्माण होण्याची गरज आहे.
गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आपल्याला सगळेच समजते हा गैरसमज काढून शिकण्याची प्रक्रिया स्वीकारली पाहिजे. केवळ पाठ्यपुस्तकांतून शैक्षणिक वर्ष पूर्ण होते; परंतु मुलांमध्ये शिकण्याची गुणवत्ता वाढविणे शिक्षकांच्या हाती आहे. स्वच्छतेचे धडे, वाहतूक नियमाची शिस्त, शाळेत-रस्त्यावर थुंकू नये, या नागरी जाणिवा विद्यार्थ्यांना शिक्षणातून शिकविता आल्या पाहिजेत. त्यासाठी तेवढी गुणवत्ता शिक्षकांमध्ये वाढणे अपेक्षित आहे. तुमची छाप विद्यार्थ्यांवर पडली पाहिजे. शिक्षकाच्या भूमिकेत एकरूप होऊन शिकविले तर तुम्ही लक्ष वेधून घेऊ शकता. हे केले नाही तर विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढणार नाही, कदाचित त्याचे गुण वाढतील, पण माणूस म्हणून तो प्रगल्भ होणार नाही, असे मुंढे म्हणाले.
लर्निंग अॅबिलिटी वाढवा
केवळ शिकविणे एवढीच शिक्षकाची भूमिका मर्यादित नाही. विद्यार्थ्यांमधील लर्निंग अॅबिलिटी वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सामाजिक जाणिवा प्रगल्भ करण्याची भूमिका शिक्षकांनी बजविणे अपेक्षित आहे. इंग्रजी शाळांमध्ये मुलांसाठी जे उपक्रम राबविले जातात ते मनपा शाळेतही शक्य आहे. यासाठी शिक्षकांची भूमिका शिकविण्याची असली पाहिजे. मग आरोग्य असेल, एकाग्रता वाढविणे असेल, आरोग्याची काळजी असेल, संपर्ककला असेल या माध्यमातून मुलांमध्ये शिकण्याची गुणवत्ता वाढविणे अपेक्षित आहे.