पहिली ते चौथीचे वर्गही सुरू व्हावेत - शिक्षकांसह पालकांची इच्छा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:15 AM2021-02-10T04:15:08+5:302021-02-10T04:15:08+5:30
नाशिक - शालेय शिक्षण विभागाने २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीच्या वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिल्ह्यातील बहुतांश शाळांधील पाचवीते ...
नाशिक - शालेय शिक्षण विभागाने २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीच्या वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिल्ह्यातील बहुतांश शाळांधील पाचवीते आठवीचे सुरू झाले आहेत. परंतु, पहिली ते चौथीचे वर्ग अद्यापही सुरू झालेले नाही. त्यामुळे विद्यार्थी शालेल वातावरण आणि प्रत्यक्ष शिक्षण प्रवाहापासून दूर जाऊ नये यासाठी पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्याची आवश्यकता शिक्षण संस्थाचालांसह शिक्षक व पालकांकडूनही व्यक्त होत आहे.
पहिल्या टप्प्यात नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाल्यानंतर पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू झाले. तत्कालिन परिस्थितीत
मुलांना शाळेत पाठविण्यास पालकांच्या मनात धाकधूक होती. मात्र शाळा सुरू होऊन पंधरा दिवसांचा कालावधी उलटल्यानंतर सर्वच विद्यार्थी सुरक्षीत असल्याने आता पहिली ते चौथीचे वर्गही सुरू व्हावेत अशी इच्छा शिक्षण संस्थाचालक,शिक्षकांसह पालकांकडून व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत असून, कोरोना लसीकरणालाही जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. त्यामुळे ४ जानेवारीपासून शहरासह जिल्हाभरात सुरू करण्यात आलेल्या नववी ते बारावीच्या वर्गांना विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर पाचवी ते आठवीचे वर्गही सुरळीत सुरू असल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि कोरोनाचा कमी झालेला प्रभाव लक्षात घेऊन शिक्षण विभागाकडून शाला सुरू करण्यासंदर्भात ठोस सकारात्मक भूमिका घेण्याची अपेक्षा शैक्षणिक वर्तुळातून व्यक्त होत आहे.
--
मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी आता शाळा सुरू होणे आवश्यक आहे, सध्या ऑनलाईन शिक्षण सुरू असले तरी मुले शालेय शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जाऊ नये यासाठी शाळा सूरू होणे आवश्यक आहे. शाळा,संस्थास्तरावर त्यासाठी पूर्व नियोजन सुरू आहे. मात्र शिक्षण विभागाकडून यासंदर्भात अद्याप कोणत्याही सूचना नाही.
- राजेंद्र निकम, कार्यावाह, नाएसो.
--
शाळा बंद राहून आता प्रदीर्घ कालावधी उलटला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा शालेय वातावरणात रमण्यासाठी शाळा सुरू होणे आवश्यक असून पालकांचीही हीच इच्छा आहे. यापू्र्वी सुरू झालेल्या शाळांंमधील विद्यार्थीही सुरक्षित आहे. याचा विचार करून शाळा लवकरात लवकर सुरू होणे गरजेचे आहे.
- नंदलाल धांडे , अध्यक्ष ,खासगी प्राथमिक शिक्षक
--
-विद्यार्थ्यांनाही ऑनलाईनपेक्षा शाळेत जाऊन चांगले शिक्षण मिळेल. आता धोकाही कमी झाला असून शाळेत जाणारे पाचवी सहावीचे विद्यार्थी सुरक्षित आहेत. ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयांतील संकल्पना सष्ट होत नाही. त्याप्रमाणे ऑनलाईन शिक्षण सुरू असताना पालकांनाही विद्यार्थ्यांसोबत थांबावे लागते. त्यामुळे शाळा सुरू होणे गरजेचे आहे.
विलास पवार, पालक.
--
पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्यासंदर्भात शासनाकडून शिक्षण विभागाला कोणत्याही सुूचना नाही. त्यामुळे अजून प्राथमिक शाळा सुरू करण्यासंदर्भात नियोजन झालेले नाही. शासन आदेशाशिवाय शाळा कधी सुरू होणार याविषयी आत्ताच काही सांगता येणार नाही.
राजीव म्हसकर , प्राथमिक शिक्षणाधिकारी
पहिली ते चौथीचे विद्यार्थी
वर्ग - विद्यार्थी - विद्यार्थिनी
पहिली - ६१३२८ - ५५७१७
दुसरी - ६३,९३० -५७४१२
तिसरी - ६४५१९ - ५६०९९
चौथी - ६६३९२ - ५७५४७