शास्त्रीय संगीत ही समाजासाठी दौलत
By admin | Published: November 30, 2015 10:39 PM2015-11-30T22:39:31+5:302015-11-30T22:42:18+5:30
बाळासाहेब थोरात : यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार हिंगणे यांना प्रदान
नाशिक : मनाला, अंत:करणाला भिडते ते संगीत. अनेक घराणी, गायकांनी वर्षानुवर्षे सेवा करीत शास्त्रीय संगीताला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. ही समाजासाठी एकप्रकारची दौलत असून, ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे, असे उद्गार माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नाशिक विभागीय केंद्राच्या वतीने प्रा. मकरंद हिंगणे यांना यंदाचा कलाक्षेत्रातील (संगीत) यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार थोरात यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. २१ हजार रुपये, सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून थोरात बोलत होते. नाशिक केंद्राचे अध्यक्ष विनायकदादा पाटील, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, डॉ. अशोक पिंगळे व्यासपीठावर उपस्थित होते. थोरात म्हणाले, पाच-सात वर्षांपूर्वी नवी चांगली मराठी गाणी, चित्रपट येणे थांबले होते; मात्र ‘नटरंग’, ‘बालगंधर्व’, ‘कट्यार’सारख्या चित्रपटांमुळे शास्त्रीय संगीताला चांगले दिवस आले. शास्त्रीय संगीत ही एकप्रकारची ध्यानधारणाच आहे. अनेक कलावंतांनी ते सोन्यासारखे उजळवून काढले आहे. कलाभ्यासाला चालना देण्यासाठी खास या विषयाला वाहिलेल्या शाळा, महाविद्यालये निर्माण होत असल्याची बाब चांगली असल्याचे ते म्हणाले. यशवंतराव चव्हाण हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
पुरस्काराला उत्तर देताना हिंगणे म्हणाले, मूळ गाव चांदोरीतील निसर्गरम्य वातावरणामुळे आपल्यातील कलेला चालना मिळाली. आज संगीताबद्दल धेडगुजरी वातावरण असून, उच्च दर्जाचे शास्त्रीय संगीत आणि बाजारू संगीत एकाच वेळी तयार होते आहे. मनोरंजनासाठी गाणी तयार होणे, हे वाईट नाही; मात्र त्याच्या किती आहारी जायचे, हे ज्याचे त्याने ठरवावे. शाळेत दहावीनंतर कलाशिक्षण बंद होत असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.
विनायकदादा पाटील यांनी प्रास्ताविक केले. पूर्वी मुंबईत एकत्रितरीत्या दिले जाणारे पुरस्कार प्रतिष्ठानने विभागीय केंद्रांना अधिक स्वायत्तता दिल्यामुळे यंदा प्रथमच ठिकठिकाणी होत असून, नाशिक केंद्राने कला क्षेत्रातील पुरस्कारापासून प्रारंभ केल्याचे ते म्हणाले. स्वानंद बेदरकर यांनी सूत्रसंचालन केले. तुषार पगार यांनी स्वागत केले. सुखदा बेहेरे यांनी वंदे मातरमचे गायन केले. डॉ. बच्छाव यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)प्रा. मकरंद हिंगणे यांना यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार (संगीत) प्रदान करताना बाळासाहेब थोरात. समवेत विनायकदादा पाटील, डॉ. शोभा बच्छाव, डॉ. अशोक पिंगळे, तुषार पगार.