वर्गमैत्रिणी पसार : शाळकरी मुली बेपत्ता होण्याच्या घटना सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 03:56 PM2018-12-08T15:56:50+5:302018-12-08T16:01:31+5:30
शहरातून अल्पवयीन मुली बेपत्ता होण्यामागील काही कारणे ही वैयक्तिक किंवा कौटुंबिक असल्याचे अद्याप पुढे येत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे
नाशिक : गंगापूररोडवरील शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या व एका खासगी शाळेत दहावीच्या वर्गात शिकणाºया दोन अल्पवयीन वर्गमैत्रिणी अचानकपणे परिसरातून कोणाला काहीही न सांगता बेपत्ता झाल्याने भीती व्यक्त होत आहे. त्यांच्या नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेऊनही त्या आढळून आल्या नसल्याने गंगापूर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे.
काही दिवसांपुर्वीच शहरातील अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सिडको भागातील अशाच काही मुली बेपत्ता झाल्या होत्या; मात्र पोलिसांनी अल्पवेळेतच त्यांचा शोध घेत नातेवाईकांच्या हवाली केले होते. शहरातून अल्पवयीन मुली बेपत्ता होण्यामागील काही कारणे ही वैयक्तिक किंवा कौटुंबिक असल्याचे अद्याप पुढे येत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे; मात्र अल्पवयीन शाळकरी मुली बेपत्ता होण्याची बाब चिंताजनकदेखील आहे. शाळा-महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना तरुणी राहत्या घरांमधून कोणालाही काहीही न सांगता निघून जात असल्याने भीती व्यक्त केली जात आहे. पोलिसांपुढे हे नवे आव्हान उभे राहिले आहे. तसेच शाळांच्या शिक्षकांपुढेदेखील आहे. विद्यार्थ्यांचे समुपदेशन वर्ग किंवा कार्यशाळा शाळांमध्ये राबविण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.
शिवाजीनगरमधील शेजारी-शेजारी राहणा-या दोन कुटुंबातील मुली अशाच पध्दतीने कोणाला काहीही माहिती न देता पसार झाल्या आहेत. या दोन्ही मुली अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी सांगितले. शुक्रवारी (दि.७) दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्या बेपत्ता झाल्याचे नातेवाईकांच्या लक्षात आले आणि सर्वत्र शोधाशोध सुरू झाली. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात बेपत्ता झालेल्या एका १५वर्षीय शाळकरी मुलीच्या आईने गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. मुलींचा शोध घेण्यासाठी गंगापूर पोलिसांनी शहर व परिसरात शोधमोहिम सुरू केली आहे.