मेंदूचे कपाट स्वच्छ करा : महेश करंदीकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 01:11 AM2018-12-20T01:11:13+5:302018-12-20T01:11:33+5:30
जसे आपण आपल्या घरातील कपाट व्यवस्थित अगदी मनापासून आपल्याला हवे तसे ठेवतो अन् त्याची वेळोवेळी निगा राखतो, अगदी तसेच मेंदूच्या कपाटाचीही स्वच्छता करण्यास आपण वेळ द्यायला हवा. विनाकारण वाईट विचार, दु:खद बातम्या, नकारात्मक भावनांचा कचरा मेंदूत साठवून ठेवू नये, असे प्रतिपादन मेंदू शल्यविशारद डॉ. महेश करंदीकर यांनी केले.
सावाना ग्रंथालय सप्ताह
नाशिक : जसे आपण आपल्या घरातील कपाट व्यवस्थित अगदी मनापासून आपल्याला हवे तसे ठेवतो अन् त्याची वेळोवेळी निगा राखतो, अगदी तसेच मेंदूच्या कपाटाचीही स्वच्छता करण्यास आपण वेळ द्यायला हवा. विनाकारण वाईट विचार, दु:खद बातम्या, नकारात्मक भावनांचा कचरा मेंदूत साठवून ठेवू नये, असे प्रतिपादन मेंदू शल्यविशारद डॉ. महेश करंदीकर यांनी केले. सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने साजऱ्या केल्या जाणाºया ग्रंथालय सप्ताहामध्ये बुधवारी (दि.१९) करंदीकर यांनी ‘सुखाचा शोध : मानवी मेंदूत दडलयं काय?’ या विषयावर व्याख्यान दिले. यावेळी त्यांनी मेंदूचे कार्य, मेंदूला होणारे आजार, मेंदू सक्षम नसल्यास ओढावणारे दुर्धर आजार, मेंदूचे आरोग्य राखण्याबाबतच्या उपाययोजना, मेंदू विकाराची लक्षणे यांची कारणमीमांसा केली. यावेळी ते म्हणाले, माणूस काम करतो हे केवळ पैसे मिळवून त्याच्या गरजा भागविण्यासाठी नव्हे तर त्या कामापासून समाधान मिळविणे हादेखील उद्देश असतो. माणसाने आपल्या मेंदूमधील बुद्धीकेंद्र आणि स्मृतीकेंद्राचा ताळमेळ बसविणे गरजेचे आहे. बुद्धी आणि भावना यांची सांगड घातल्यास सुख-समाधानापासून तो वंचित राहू शकत नाही, असे करंदीकर यावेळी म्हणाले. मोठा मेंदू, लहान मेंदू, मज्जारज्जू असे मेंदूचे भाग आहेत. मेंदूचे कार्य हे केमिकल्सवर चालते. चांगली केमिकल्स वाढविले तर आपण आपला मेंदू निरोगी ठेवू शकतो.
मेंदूचे संकेत ओळखा
लहानशा कारणावरून अचानक रागाचा पारा चढणे, चिडचिड होणे, संताप येणे, शरीराच्या सर्वच भागात दुखावा जाणवणे, सतत निराशावादी विचार येणे, रात्री झोप न लागणे, दिवसा झोप येणे हे मेंदूचे संकेत ओळखणे गरजेचे आहे. मेंदूचे कपाट चांगल्या विचारांनी भरून मनातील जुना मान, अपमान काढून टाकत मेंदू स्वच्छ ठेवावा, असा सल्लाही त्यांनी सोप्या भाषेत दिला. मेंदूचे आरोग्य राखण्यासाठी पौष्टीक आहार गरजेचा आहे. विविध प्रकारच्या जीवनसत्त्वांची गरज मेंदूला असते. त्यामुळे आहारात दही, गाजर, सोयाबीन, गर असलेल्या फळांचा समावेश करावा तसेच शक्यतो उपवासापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा, असेही ते म्हणाले.