नाशिक जिल्ह्यात स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 07:15 PM2019-08-21T19:15:16+5:302019-08-21T19:16:08+5:30
गेल्या वर्षापासून देशभरात ग्रामीण भागात स्वच्छता कायम राहण्याच्या अनुषंगाने ग्रामपंचायतींचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणात प्रत्येक जिल्ह्यामधून २५ ते ३० गावांची पडताळणी केंद्र शासनाने नियुक्त केलेल्या समितीकडून करण्यात येते.
लोकमत न्युज नेटवर्क
नाशिक : पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेचा शुभारंभ बुधवारी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे यांच्या उपस्थितीत करण्यात येऊन या सर्वेक्षणाचे काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. स्वच्छतेचे काम हे पुण्याचे काम असून, स्वच्छता ठेवली तरच तेथे लक्ष्मी नांदते ही आपली संस्कृती व परंपरा आहे. प्रत्येक गावाच्या स्वच्छतेची जबाबदारी आपल्या सर्वांची असून प्रत्येकाने जबाबदारी स्वीकारून काम करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन सांगळे यांनी यावेळी केले.
गेल्या वर्षापासून देशभरात ग्रामीण भागात स्वच्छता कायम राहण्याच्या अनुषंगाने ग्रामपंचायतींचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणात प्रत्येक जिल्ह्यामधून २५ ते ३० गावांची पडताळणी केंद्र शासनाने नियुक्त केलेल्या समितीकडून करण्यात येते. यात प्रामुख्याने शाळा, अंगणवाडी केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत, आठवडी बाजार, धार्मिक स्थळ या ठिकाणी सर्वेक्षण केले जाणार असून या सर्वेक्षणांतर्गत ग्रामीण भागातील ५० लाख नागरिकांची स्वच्छतेविषयक प्रत्यक्ष तसेच आॅनलाइन प्रतिक्रिया नोंदविली जाईल. स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण अंतर्गत प्रत्येक गावातील सरपंच, स्वच्छताग्रही, ग्रामपंचायत सदस्य, देखरेख समिती सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, शिक्षकांच्या माध्यमातून पाहणी केली जाणार आहे. यासोबतच प्रत्येकी ७ ते ८ गावांमध्ये सामान्य नागरिक तसेच सामूहिक बैठकांच्या माध्यमातून सर्वेक्षण केले जाईल. त्यासाठी आयोजित कार्यशाळेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनीही शेवटच्या सत्रात कार्यशाळेमध्ये उपस्थित राहून माहिती घेतली. यावेळी समाजकल्याण सभापती सुनीता चारोस्कर, महिला व बालकल्याण सभापती अपर्णा खोसकर, जि. प. सदस्य भास्कर गावित, बाळासाहेब क्षीरसागर, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, समाजकल्याण अधिकारी मंगेश वानखेडे आदी उपस्थित होते.